- मनोहर कुंभेजकर मुंबई : मुंबई ग्राहक पंचायतीच्या सूचनेचा स्वीकार करून, महारेराने मुंबई व पुणे येथे स्थापन केलेल्या सलोखा मंचांनी गेल्या सहा महिन्यांत घर खरेदीदारांच्या ९० टक्क्यांहून अधिक तक्रारी दोन्ही पक्षांच्या सामंजस्याने समाधानकारकरीत्या सोडविल्या. मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली.मार्चमध्ये मुंबईत १० तर पुण्यात ५ सलोखा मंच महारेराने मुंबई ग्राहक पंचायतीच्या सूचनेनुसार सुरू केले. पर्यायी तक्रार निवारण यंत्रणा म्हणून रेरा कायद्यांतर्गत अस्तित्वात आलेल्या या सलोखा मंचाला यश मिळेल, असे सुरुवातीला वाटले नव्हते, परंतु मुंबई ग्राहक पंचायत व क्रेडाई, एमसीएचआय व नॅरेडको या विकासकांच्या संघटनांतील अग्रणींनी यात पुढाकार घेऊन, ग्राहकांच्या तक्रार निवारणाबाबत सकारात्मक भूमिका घेऊन, अनेक विकासकांना त्यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारी ग्राहकांना दिलासा देतील, अशा पद्धतीने सोडविण्यास राजी केले.सलोखा मंचात सामंजस्य होऊन सुटलेल्या तक्रारींचे फायदे अनेक आहेत. या मंचावर ग्राहक व विकासक या दोन्ही बाजूच्या संघटनांचे प्रतिनिधी असल्याने, तक्रारदार ग्राहक, तसेच विकासक या दोघांनाही या मंचाबद्दल विश्वास वाटतो, असे देशपांडे यांनी सांगितले.सर्वसाधारणपणे दोन ते तीन बैठकीतच दोन्ही बाजूंमध्ये सामंजस्य घडवून आणण्यात मंच सदस्यांना यश मिळत आहे, यासाठी ग्राहकाला भरावी लागणारी फी केवळ एक हजार रुपये आहे. त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दोन्ही बाजूंमध्ये मंच सदस्याच्या उपस्थितीत लेखी समझोता झाल्याने, विकासक त्याविरुद्ध अपिलातही जाऊ शकत नाही. त्यामुळे अपिलात होणारा कालपव्यय व त्यासाठीचा खर्चही वाचतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.>मुंबईतील ७५ तक्रारींचे निवारणमुंबईतील १० सलोखा मंचांनी ७५ तक्रारींत यशस्वीरीत्या समझोता घडवून आणला असून, १२ तक्रारींत समझोता घडवून आणण्यात यश आले नाही. पुण्यातील ५ सलोखा मंचांनी ४४ तक्रारींमध्ये यशस्वी समझोता घडवून आणला, तर केवळ २ तक्रारींमध्ये समझोता होऊ शकला नाही.अशा प्रकारे महारेराच्या मुंबई व पुण्यातील १५ सलोखा मंचांनी १३३ पैकी ११९ तक्रारींमधे यशस्वी समझोता घडवून आणून, पर्यायी तक्रार निवारण व्यवस्थेत यशस्वितेचा उच्चांक गाठला.
घर खरेदीदारांच्या ९० टक्के तक्रारी गेल्या सहा महिन्यांत सामंजस्याने मिटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 6:19 AM