गणेशोत्सवातील अखेरच्या रविवारी मुंबापुरीत गणेशभक्तांचा महापूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 04:51 AM2017-09-04T04:51:34+5:302017-09-04T04:51:54+5:30
गणेशोत्सवातील अखेरच्या रविवारी बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबापुरीत भक्तांचा महापूर लोटला होता. यामुळे वाहतूक विभागाने विविध रस्ते मार्गांत बदल केले.
मुंबई : गणेशोत्सवातील अखेरच्या रविवारी बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबापुरीत भक्तांचा महापूर लोटला होता. यामुळे वाहतूक विभागाने विविध रस्ते मार्गांत बदल केले. परिणामी, कमी अंतरासाठीही वाहनचालकांना बराच कालावधी खर्च करावा लागल्याने, प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, भक्तांच्या उत्साहावर त्याचा तसूभरही परिणाम झाला नाही.
मुसळधार पावसाने रविवारी सकाळी तुफान बॅटिंग सुरू केली होती. मात्र, दुपारच्या सुमारास पावसाने दडी मारताच, लाखो गणेशभक्त बाप्पाच्या दर्शनासाठी रस्त्यावर उतरले. त्याचा फटका रस्तेवाहतुकीला बसला. वाहतूक पोलिसांनी लालबाग, परळ आणि गिरगावातील विविध रस्ते बंद केले होते, तर काही मार्गांवरील वाहतुकीला पर्यायी मार्गांची बगल दिली होती. विशेषत: लालबाग परिसरात पोहोचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते. कारण चिंचपोकळी उड्डाणपुलावरून येणाºया वाहनांना सरदार हॉटेलकडे जाण्यासाठी, डॉ. आंबेडकर मार्गावरून असलेले उजवे वळण पोलिसांनी बंद केले होते, तर काळेवाडी परिसरातून साईबाबा पथमार्गे भारतमाता चित्रपटगृहाकडे जाणारी वाहतूकही बंद ठेवल्याने, प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले.
दर्शनासाठी काही तास!
गेल्या १० दिवसांपासून मुंबईत पाहुणचारासाठी आलेल्या बाप्पाच्या दर्शनासाठी, आता काही तासच शिल्लक राहिले आहेत. अनंत चतुर्दशी जसजशी जवळ येत
आहे, तसतशी बाप्पाच्या चरणाचे दर्शन घेण्यासाठी, मुंबईत येणाºया भाविकांच्या संख्येत वाढ दिसू लागली आहे.