Join us

"गेल्या वेळी राष्ट्रवादीने राज्यसभेत जागा वाढवली, घाट्यामध्ये आम्ही आहोत, त्यामुळे सहावी जागा शिवसेनेचीच"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 20:15 IST

Sanjay Raut: राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात चुरस वाढली आहे. त्यातच शिवसेनेने सहाव्या जागेवर आपला उमेदवार देण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतल्याने सहाव्या जागेवरून अपक्ष लढण्याच्या तयारीत असलेले खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे.

मुंबई - राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात चुरस वाढली आहे. त्यातच शिवसेनेने सहाव्या जागेवर आपला उमेदवार देण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतल्याने सहाव्या जागेवरून अपक्ष लढण्याच्या तयारीत असलेले खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीतील सहावी जागा ही शिवसेनेचीच असेल असे सांगत शिवसेना या जागेसाठी टाम असल्याचे संकेत दिले आहेत.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कुठलीही खलबतं झाली नाहीत. राज्यसभेबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला माहिती आहे. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो पक्ष पुढे नेईल. त्यामुळे सहाव्या जागेसाठी खास अशी खलबतं झाली नाहीत. तर अनेक विषय महत्त्वाचे असतात त्यावर चर्चा झाली.

यावेळी संभाजीराजेंसाठी मराठा संघटनांच्या नेत्यांनी घेतलेल्या भेटीबाबत संजय राऊत म्हणाले की, संभाजीराजेंच्या उमेदवारीबाबत मराठा संघटनांचे प्रतिनिधी आम्हाला भेटले होते. त्यांचं काही म्हणणं आहे. संभाजीराजेंचंही काही म्हणणं आहे. शिवसेनेचाही काही मुद्दा आहे. आमचं म्हणणं आहे की, सहावी जागा ही शिवसेनेची आहे. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार त्या जागेवरून लढेल आणि विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणजे आमच्या पक्षप्रमुखांचं असं म्हणणं आहे की, दुसऱ्या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार निवडून जाईल. छत्रपती आमचेच आहे. त्यांचं आमचं नातं आहे. त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली आहे की, त्यांना निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी शिवसेनेमध्ये यावं, त्यानंतर त्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. त्यात कुणाच्या भावना दुखावण्याचा प्रश्न नाही. ही जागा शिवसेनेची आहे. आम्हाला राज्यसभेत एक जागा वाढवायची आहे. मागच्या वेळी राष्ट्रवादीने एक जागा वाढवली. पुढच्यावेळी दुसरा कुणी वाढवेल. घाट्यामध्ये आम्ही आहोत. शिवसेना हा शिवसेनेचा उमेदवारच पाठवण्यावर ठाम आहोत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. 

दरम्यान, शिवसेनेचा दुसरा उमेदवार म्हणून चंद्रकांत खैरे आणि उर्मिल मातोंडकरच्या नावांच्या सुरू असलेल्या चर्चेबाबत थेट उत्तर देणे राऊत यांनी टाळले. ते म्हणाले की, उमेदवारीसाठी नावं खूप असतात. मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय हा पक्षप्रमुखच घेतील. 

टॅग्स :संजय राऊतसंभाजी राजे छत्रपतीशिवसेनाराज्यसभा