मीरारोड - आम्ही केवळ कायद्याला घाबरतो, बाकी कोणाला घाबरत नाही. त्यामुळे अश्या धमक्या खूप झाल्या. दोन वर्ष झाली महाविकास आघाडी सरकारला. भाजपाच्या कोणा कार्यकर्त्याला आत घातलेत ? कारण आम्ही काही केलेच नाही. तुमची मात्र रांग लागली , काही सुपात तर काही जात्यात आहेत असे प्रत्युत्तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे नाव मी घेता दिले .
मीरा भाईंदर भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड. रवी व्यास यांच्या पदग्रहण आणि कार्यकर्ता मेळाव्यासाठी पाटील हे गुरुवारी भाईंदर मध्ये आले होते. राजकारणाचे गुन्हेगारीकरण वर भाजपा २० हजार सभा घेऊन लोकां मध्ये जाणार आहे. महाविकास आघाडीचा प्रताप लोकांना सांगणार. डिसेंबर मध्ये मुंबईत मोठे आंदोलन करणार. माजी गृहमंत्री जेल मध्ये तर मुंबईचा माजी पोलीस आयुक्त फरार. काही पोलीस जेल मध्ये आहेत. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे. सर्व प्रकारचे गुन्हे हे कोणा ना कोणाच्या नावाला चिकटले आहेत . राज्याचा सत्यानाश चालला आहे असे पाटील म्हणाले.
त्रिपुरा मधील मशीद पडल्याच्या अफवांवर राज्यात क्रिया - प्रतिक्रिया सुरु झाल्या पण त्याचे मूळ शोधले पाहिजे . सुरवात कोणी केली ते कळले पाहिजे. बरी बाब अशी आहे की, मालेगावात मुस्लिम संघटनांच्या कार्यालयावर धाडी टाकून काही गोष्टी जप्त झाल्या आहेत . फडणवीस सरकार काळात एकही दंगा झाला नाही. ९५ टक्के मुस्लिम हे दंगली आदींच्या विरुद्धच आहेत. केवळ ५ टक्के मुसलमान दंगे करून अन्य ९५ टक्के मुस्लिमांवर दंगलीचे लेबल चिटकवतात . महाविकास आघाडी ठाम भूमिका घ्या ऐवजी बोटचेपी भूमिका घेत आहे असा आरोप त्यांनी केला.
एसटी कामगारांच्या संपा बद्दल सरकार ताठर आहे . जे सरकारी कर्मचाऱ्याला ते एसटी कर्मचाऱ्याला असे करता येईल . बोनस अडीज हजार दिला नाही व कोविड काळात काम केले त्याचा पगार नाही . न्यायालयाने आवाहन करून देखील काही फरक पडलेला नाही . भाजपाचा आंदोलनास पाठिंबा आहे असे ते म्हणाले. त्रास देऊन सुद्धा विधानसभेत निम्म्या जागा दिल्या . आदर दिला तरी विश्वासघात केला अशी टीका शिवसेनेवर केली . पुण्यात मनसे सह सर्व पक्षांनी मिळून मला हरवण्याचा प्रयत्न केला . २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली ४१८ जागा एकट्या भाजपाला मिळणार असे ते म्हणाले.
कार्यक्रमा वेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्याने पाटील यांनी या पुढे फटाके फोडणे बंद करा असे आवाहन केले . त्याने प्रदूषण पसरते , कचरा होतो . दिवाळीत हजारो पक्षी जखमी झाले असे सांगितले . मीरा भाईंदर मध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड . रवी व्यास यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आणखी मजबूत होईल . नवीन कार्यकारणी तयार करा . पालिका निवडणूक जवळ असून थोडेफार मतभेद असतातच पण पक्षाच्या पराभवात रूपांतर करू नका असा सल्ला त्यांनी दिला.