लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पावसाळा तोंडावर असल्याने पावसाळीपूर्व कामांसाठी शेवटचा आठवडा उरला आहे. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांना वातानुकूलित केबीन सोडून रस्त्यावर उतरावे लागले आहे. नालेसफाई व रस्त्यांची कामे डेडलाईनपूर्वी करून घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांना स्वत: विभागात पाहणी करावी लागत आहे. त्यामुळे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.ठेकेदारांसाठी शोधाशोध, नाल्याच्या तोंडावरच पडलेला गाळ आणि नालेसफाईसाठी व बिगर शासकीय संस्थावर असलेली मदार यामुळे मुंबईची तुंबापुरी होण्याचा धोका नगरसेवकांकडून व्यक्त होत आहे. गेले अनेक वर्ष पावसाळ्यात मुंबईतील नाल्यांची अवस्था वाईट असल्याचे व त्यामुळे पाणी तुंबून राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रस्ते कामांची अवस्थाही फारशी चांगली नसल्याने पाणी साचत असल्याचे चित्र होते.एकीकडे नालेसफाईवर महापौर नाराज असताना नालेसफाई ७८ टक्के पूर्ण झाल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना केबिनबाहेर पडून रस्त्यावर व नालेसफाईच्या कामावर नजर ठेवण्याचे आदेश आयुक्त अजय मेहता यांनी दिले.त्यानुसार प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी आणि गुरुवारी चार अतिरिक्त आयुक्त पावसाळीपूर्व कामे वेळेवर होत असल्याची खातरजमा करीत आहेत. अतिरिक्त आयुक्त (शहर) पल्लवी दराडे यांनी मंगळवारी शहर विभागातील रस्ते, नालेसफाई व विकास प्रकल्प यांची पाहणी केली. पावसाचे आगमन येत्या काही दिवसांतच होणार असल्याने रस्ते दुरुस्ती कामांचे नियोजन करुन ती कामे पूर्ण करावी, असे त्यांनी ठेकेदारांना बजावले. या ठिकाणांची पाहणी...रस्ते व नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त दराडे यांनी वरळी लव्हग्रोव्ह पंम्पिंग स्टेशन, एल. पी. जी. नाला, टेक्सटाईल नाला, दादर-धारावी नाला, वडाळा ट्रक टर्मिनल, जे. के. केमिकल नाला,आर. के. किडवई मार्ग, हार्डिकर मार्ग येथील सिमेंट काँक्रीटीकरण कामे, तानसा पाईपलाईन संदर्भातील कामे, शीव- कोळीवाडा येथील स्थलांतरित करण्यात येणारी दुकाने व रे रोड जवळील ब्रिटानिया पंम्पिंग स्टेशनची पाहणी केली.मोठ्या नाल्यांच्या सफाईद्वारे १ लाख ७७ हजार ७६६ मेट्रिक टन एवढा गाळ येत्या पावसाळ्यापूर्वी हटविणे अपेक्षित आहे. यापैकी २० मे २०१७ पर्यंत सुमारे १ लाख ३९ हजार ४८५ टन गाळ काढून व वाहून नेण्यात आला आहे.मे च्या तिसऱ्या आठवड्याच्या अखेरपर्यंत शहर विभागातील मोठ्या नाल्यांमधून ९ हजार ९०१ मेट्रिक टन गाळ काढून व वाहून नेण्यात आला आहे. पश्चिम उपनगरांमध्ये ७८ हजार १७८ मेट्रिक टन तर पूर्व उपनगरांमध्ये ५१ हजार ४०६ मेट्रिक टन एवढा गाळ काढून व वाहून नेण्यात आला आहे.मिठी नदीमधील गाळ काढून व वाहून नेण्याचे काम २० मे पर्यंत ६६.१० टक्के झाले आहे. छोट्या नाल्यांच्या व रस्त्यालगतच्या वाहिन्यांच्या सफाईची कामे विभाग स्तरावर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने केली जात आहेत.
नालेसफाईचा शेवटचा आठवडा
By admin | Published: May 24, 2017 2:03 AM