खलील गिरकर मुंबई : सरते २०१९ हे वर्ष देशातील नौकावहन क्षेत्रासाठी काहीसे दिलासादायक ठरले. या वर्षात देशाच्या नौकावहन क्षेत्रासाठी अनेक नवीन बाबींना प्रारंभ करण्यात आला. नौकावहन क्षेत्रातील भारतीयांची संख्या वाढविण्यात यश मिळाले. या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या.क्रुझ पर्यटनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाचा लाभ झाल्याचे पर्यटकांच्या वाढलेल्या संख्येवरून सिद्ध झाले. चेहरा तपासून त्याद्वारे नौकावहन क्षेत्रातील कर्मचाऱ्याचे ओळखपत्र व कागदपत्र तयार करण्याची जगातील पहिली प्रक्रिया सुरू करण्यात आली. बंदर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे तांत्रिक कौशल्य वाढविण्यासाठी सरकारतर्फे सागरमाला दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल योजना राबवून त्याद्वारे गुजरात, महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश येथे प्रशिक्षण देण्यात आले.जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे मल्टि स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यात आले. याद्वारे दरवर्षी मेरिटाइम लॉजिस्टिकमध्ये १,०५० जणांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. सेंट्रल इनलँड अँड कोस्टल मेरिटाइम टेक्नॉलॉजीचे खरगपूर आयआयटीमध्ये भूमिपूजन करण्यात आले. लवकरच या केंद्राद्वारे प्रशिक्षित तरुण सेवेत दाखल होतील.क्रुझ पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांना चांगले यशमिळत असल्याचे पर्यटकांच्या वाढत असलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. नौकावहन मंत्रालयाने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय क्रुझ पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध सवलती दिल्या आहेत.
गतवर्षात नौकावहन क्षेत्रात भारतीयांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 12:09 AM