अखेर राज ठाकरेंचं 9 ऑगस्टला दिलेल्या भाषणातील 'ते' भाकीत खरं ठरलं; मनसेचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 11:12 AM2019-08-28T11:12:57+5:302019-08-28T11:13:29+5:30
पैसेरहित अर्थक्रांतीला सुरूवात झाल्याची टीका केंद्र सरकारवर करण्यात आली आहे.
मुंबई - सध्या देशातील आर्थिक परिस्थिती नाजूक असून मंदीमुळे अनेक जणांना रोजगारापासून मुकावं लागतंय. आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी केंद्राने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 1 लाख 76 हजार कोटी रूपये घेतल्याची बातमी आहे. यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडण्यास सुरूवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 9 ऑगस्टच्या कार्यकर्ता मेळाव्यात केलेल्या भाषणाची आठवण करून देत मनसेने केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली आहे.
मनसेने ट्वीट करत 'नोटबंदी आणि जीएसटीमुळे पार विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेला रिझर्व्ह बँकेच्या 'रिझर्व्ह'चं ठिगळ लागणार असल्याची प्रतिक्रिया देत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात राज ठाकरेंनी 9 ऑगस्टला केलेल्या भाषणाची क्लीप दाखविण्यात आली आहे. पैसेरहित अर्थक्रांतीला सुरूवात झाल्याची टीका केंद्र सरकारवर करण्यात आली आहे.
'नोटबंदी आणि जीएसटीमुळे पार विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेला रिझर्व्ह बँकेच्या 'रिझर्व्ह'चं ठिगळ लागणार'... हे राजसाहेबांचं ९ ऑगस्ट २०१९ चं भाकीत खरं ठरलं! pic.twitter.com/5Lv4pA35de
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) August 27, 2019
या भाषणात राज ठाकरेंनी सांगितलं होतं की, आरबीआयकडून पैसे घेऊन देश चालविण्याची वेळ आली. आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजे पैसे रिझर्व्ह ठेवले जातात. कोणत्या बँकेने तुमचे पैसे बुडविले तर त्यासाठी हमी म्हणून रिझर्व्ह बँक असते. हा लोकांचा पैसा असतो. जर त्याच रिझर्व्ह बँकेतून सरकार पैसा काढणार असेल तर उद्या बँका डबघाईला आल्या तर तुम्हाला कोण पैसे देणार? असा सवाल त्यांनी केला होता.
तसेच एका झटक्यात तुम्हाला वाटलं म्हणून नोटबंदी केली गेली. लोकांना रांगेत उभे केले, अनेकांचे जीव गेले. आर्थिक स्थिती बिघडून टाकली. अर्थव्यवस्थेचं पुढे काय होणार याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. आज देशातील आर्थिक परिस्थिती नाजूक आहे त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी पुढे आणल्या जात आहे. समान नागरी कायदा आणणार, राम मंदीर आणणार मग इतर गोष्टी तुम्ही विसरून जाणार हे सुरू आहे असं राज ठाकरेंनी सांगितले होते.
रिझर्व्ह बँकेकडे का असता राखीव निधी?
रिझर्व्ह बँकेचा राखीव निधी हा अडचणीत आलेल्या बँकांना तारण्यासाठी असतो व वेळोवेळी त्यातून कमजोर झालेल्या बँकांना सशक्त करण्यासाठी भांडवल दिले जात असते. याचे उत्कृष्ट उदाहरण १९९६ मधील चेन्नईच्या इंडियन बँकेला १४०० कोटी एकमुश्त भांडवल देण्याचे आहे. जयललिता मुख्यमंत्री असताना कर्ज मेळाव्याद्वारे जे कर्जवाटप झाले ते परत आले नाही़ त्यामुळे इंडियन बँक दुर्बल झाली होती व तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी अर्थसंकल्पात तरतूद केली नाही म्हणून रिझर्व्ह बँकेला विनंती केली होती व रिझर्व्ह बँकेनेही ती स्वीकारली होती. आजच्या घडीला रिझर्व्ह बँकेजवळ २.५० लाख कोटी आकस्मिक तरतूद निधी (काँटीन्ज सी फंड) आहे व रिझर्व्ह बँकेजवळ जे सोने व विदेशी चलन आहे ते ६.९१ लाख कोटींचे आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचा एकूण राखीव निधी ९.४१ लाख कोटी आहे. १९९७ साली स्थापन झालेल्या एका वित्त समितीने सर्व बँकांच्या एकूण संपत्तीच्या १२ टक्के राखीव निधी रिझर्व्ह बँकेने ठेवावा, अशी शिफारस केली होती.