- सुशांत मोरे, मुंबईमध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील लोकलचा वाढता ताण कमी करण्यासाठी रेल्वेने परळ टर्मिनस बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र या कामाला मुहूर्तच मिळत नव्हता. अखेर या कामाला मुहूर्त मिळाला असून पावसाळा संपताच कामाला सुरुवात करण्यात आली आहे. अनेक छोटी कामे केली जात असून नव्या प्लॅटफॉर्मच्या पायाभरणीचेही काम सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. एमयूटीपी-२ अंतर्गत मध्य रेल्वेवर सीएसटी ते कुर्लादरम्यान पाचवा-सहावा मार्ग बांधला जाणार आहे. या प्रकल्पातच परळ टर्मिनसही बांधण्यात येईल. दादर स्थानकमार्गे आणि स्थानकातून मोठ्या प्रमाणात लोकलची ये-जा असते. त्यामुळे हा भार कमी करण्यासाठी परळ टर्मिनस उभारले जाईल. या टर्मिनसमधून दादर, सीएसटीप्रमाणेच लोकल सोडण्यात येतील. टर्मिनससाठी ५१ कोटींचा खर्च येणार आहे. परळ टर्मिनस उभारण्यासाठी मालगाडीचा ट्रॅक तोडण्यात येणार आहे. हा ट्रॅक काढून मिळालेल्या संपूर्ण जागेत परळ टर्मिनस उभारले जाईल. टर्मिनसच्या कामात सर्वांत शेवटची रूट रिले इंटरलॉकिंग सिस्टीमची कामे हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याआधी यार्ड रिमॉडेलिंग, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची कामे होतील. या कामाला मुहूर्त मिळत नव्हता. तसेच मालगाडीचा ट्रॅक तोडण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य विभागीय कार्यालयाकडून तो रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाला हस्तांतरितही करण्यात आला नव्हता. ट्रॅक हस्तांतरित करण्यात आल्याने तो तोडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.ही कामे पूर्ण झाल्यानंतर प्लॅटफॉर्मच्या पायाभरणीची कामे केली जातील. त्याचबरोबर सध्या परळ स्थानकात दादर दिशेला असलेला नवा पादचारी पूल पाडण्यात येईल आणि याच स्थानकात मध्य भागात पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सध्याच्या प्लॅटफॉर्ममध्येही काही बदल केले जातील. करी रोड दिशेलाही विस्तार करतानाच असलेल्या पादचारी पुलाला दुसऱ्या बाजूलाही पायऱ्या बांधल्या जातील. महत्वाची बाब म्हणजे ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा व अन्य काही तांत्रिक कामेही पूर्ण करण्यावर भर देऊन साधारण दोन वर्षांत हे टर्मिनस उभारले जाईल.
अखेर परळ टर्मिनसच्या कामाला सुरुवात
By admin | Published: September 30, 2016 3:51 AM