Join us

‘लसवंत’ प्रवाशांना तिकिटात सवलत; दोन सीट बुक करा, जादा सामान न्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:06 AM

प्रवासी संख्या वाढविण्यासाठी विमान कंपन्यांच्या भन्नाट ऑफर्सलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरताच हवाई प्रवाशांच्या संख्येत ...

प्रवासी संख्या वाढविण्यासाठी विमान कंपन्यांच्या भन्नाट ऑफर्स

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरताच हवाई प्रवाशांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे जास्तीतजास्त प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी खासगी विमान कंपन्यांमध्ये सवलतींची स्पर्धा रंगू लागली आहे. ‘लसवंत’ प्रवाशांना तिकिटात सवलत; दोन सीट बुक करा, जादा सामान न्या, अशा काही भन्नाट ऑफर्स सध्या प्रवाशांना दिल्या जात आहेत.

बजेट एअरलाइन अशी ओळख असलेल्या एका खासगी विमान कंपनीने लसीकरण झालेल्या प्रवाशांना तिकिटात १० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी केवळ एक डोस घेतलेल्या १८ वर्षांवरील कोणत्याही प्रवाशाला या सवलतीचा लाभ घेता येईल. मात्र, तिकीट आरक्षित करताना लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे देशांतर्गत विमान प्रवाशांना जवळपास एक ते दीड हजार रुपयांपर्यंत बचत करता येईल.

कोरोना अहवालात फेरफार करून प्रवास केल्याची प्रकरणे मागच्या काही महिन्यांत उघडकीस आली आहेत. अशा प्रवाशांपासून या कंपनीने आधीच सावधगिरी बाळगली आहे. लसीकरण झाल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करून तिकिटात सवलत मिळविल्यास चेक-इनच्या वेळेस चोरी पकडली जावी, यादृष्टीने उपाययोजना केल्या आहेत. तसा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांकडून पूर्ण भाडे वसूल करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

अन्य एका विमान कंपनीने अंतर नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्यांसाठी विशेष ऑफर जाहीर केली. प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंग राहावे यासाठी बरेच प्रवासी जादा रक्कम मोजून शेजारची सीटही बुक करतात. अशा प्रवाशांची संख्या वाढावी आणि जास्तीतजास्त सीट आरक्षित व्हाव्यात यासाठी, दोन सीट बुक करणाऱ्यांना १५ किलोपर्यंत सामान नेण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे प्रवाशांची ४ हजार रुपयांपर्यंत बचत होत असल्याची माहिती या कंपनीच्या प्रवक्त्याने दिली.

* अशाही मर्यादा

कंपन्यांनी एकापेक्षा एक ऑफर जाहीर केल्या असल्या तरी त्यालाही काही मर्यादा ठरविण्यात आल्या आहेत. ‘लसवंतां’साठी विमानतळानुरूप कोटा ठरविण्यात आला आहे. तर अतिरिक्त समान नेण्यासाठीची सवलत ३० जूनपर्यंत लागू असेल.

...............................................