मुंबई : प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांचा गुरुवारी वाढदिवस आहे. त्याच दिवशी विसर्जन गणपती विसर्जन देखील आहे. त्यामुळे बुधवारी रात्रीच बारा वाजता दीदींचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी, प्रभूकुंजच्या खाली ५० वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्यावेळी लतादीदीच्या आठवणीने उपस्थितांपैकी अनेक जण भावुक झाले होते.
वयाच्या ९० वर्षाच्या चिरतरुण गायिका आणि लतादीदींच्या भगिनी आशा भोसले या अनोख्या वाढदिवसाला उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. दीदी आमच्यातच आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. तो तितक्याच उत्साहाने साजरा करू असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. त्यांच्या परिवारातील हृदयनाथ मंगेशकर, मीनाताई मंगेशकर, उषा मंगेशकर यांच्यासह परिवारातील अनेक जण यावेळी उपस्थित होते. गायक रूपकुमार राठोड, २१ वर्षापासून सुरू असलेल्या सीआयडी मालिकेचे शिवाजी साटम, यांच्यासह सीआयडीची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती. लता दीदी हयात असताना सीआयडी ही त्यांची अत्यंत आवडीची मालिका होती. त्यावेळी त्यांनी प्रत्येक कलावंतांना स्वतःच्या सहीने चेक देखील दिले होते. या आठवणी आज त्या कलावंतांनी काढल्या. दीदी नसताना त्यांचा वाढदिवस आपण अशा रीतीने साजरा करत आहोत, हे पाहून उपस्थितांपैकी अनेकांचे डोळेही यावेळी पाणावले होते.