मुंबई- संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल संगीतकार विजय पाटील ऊर्फ रामलक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीत क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या संगीतकारांना लतादीदींच्या वाढदिवशी 5 लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असा पुरस्कार दिला जातो. त्याच पार्श्वभूमीवर संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल शासनातर्फे दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजय पाटील यांना देण्यात आला आहे.कोण आहेत रामलक्ष्मण ?रामलक्ष्मण हे भारतीय संगीतकार आणि चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक आहेत. 1976पर्यंत राम कदम व विजय पाटील रामलक्ष्मण ह्या नावाने संगीत द्यायचे. सहकारी राम कदम यांचं निधन झाल्यानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांनी रामलक्ष्मण हे नाव लावलं आणि त्याच नावानं ते संगीत देऊ लागले. राजश्री प्रॉडक्शनमधल्या एजंट विनोदनं त्यांच्या हिंदीतल्या कारकिर्दीला सुरुवात केली. हम से बढकर कौन चित्रपटातलं देवा हो देवा गणपती देवा या गाण्यानं ते प्रसिद्धीच्या झोतात आले. तसेच 1989मधील मैने प्यार कियाच्या संगीतासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. रामलक्ष्मण यांनी देवानंद, मनमोहन देसाई, महेश भट्ट यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम केलं आहे. रामलक्ष्मण यांची कारकीर्द घडवण्यात लता मंगेशकरांना सिंहाचा वाटा आहे. लता मंगेशकरांना रामलक्ष्मण यांच्याबद्दल आपुलकी होती. त्यांनी रामलक्ष्मण यांच्यासाठी गाण्यास कधीही नकार दिला नाही. लता मंगेशकर यांच्यामुळेच रामलक्ष्मण यांची कारकीर्द बहरली.