- रवींद्र मांजरेकर
मुंबई : यह पतली आवाज नही चलेगी... असं म्हणणाऱ्या बडे बडे निर्माते आणि संगीतकारांचे ते शब्द विरण्याएवढाही अवधी न देता तोच आवाज हिंदी चित्रपटसृष्टीची पहचान बनला. थोडी थोडकी नव्हे तर आठ दशके त्या आवाजाचं गारूड रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिलं... आज त्या आवाजाची नव्वदी आहे आणि सगळा आसमंत त्या स्वरसम्राज्ञीचा जन्मदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे.
सगळी वाद्यं लागलेली आहेत, साथीच्या कलाकारांची तालीम झालेली आहे... संगीतकार तयारीबाबत समाधानी आहे... रेकॉर्डिंग रुममध्ये सगळे असे जुळून आलेले आहे आणि त्याचवेळी तिथे प्रवेश झालाय तो स्वरसम्राज्ञीचा... पहिल्याच टेकमध्ये गाणे ओके झाले आहे आणि आता रसिकांपर्यंत ते गाणे पोहोचून लोकप्रियतेच्या शिखरावर स्वार होण्यास सज्ज झाले आहे... गेली आठ दशके पार्श्वगायनाच्या क्षेत्रातलं चित्रं हे असं होतं.
किती गाणी, किती भाषा, किती प्रकार...याचे हिशेब मांडले जातील. कोणाचा आवाज श्रेष्ठ, कोणाचा आवाज वैविध्यपूर्ण यावर वाद झडतील, विक्रमांचा इतिहास लिहिला जाईल... पण शेवटी गानरसिकांच्या मनावर उमटलेला असेल तो लतादिदींच्या आवाजाचा अमीट गानसंस्कार.
नायिकेच्या सौंदर्यात भर घालत गेली ८० वर्षं आपले गानविश्व व्यापून टाकणारी ही स्वरसम्राज्ञी आता रेकॉर्डिंगच्या धावपळीपासून दूर...पण ट्विटरच्या पडद्यावर कृतीशील... उत्तम स्मरणशक्तीसह, विनोदाचं टायमिंग साधत आणि क्रिकेटचं भारी वेड यांच्यासह समाधानी आयुष्य जगत आहे. त्या आरेबद्दल काय म्हणतात, जुन्या नव्या सहका-यांविषयी कोणती आठवण सांगतात, कोणता फोटो शेअर करतात, आवडीच्या गाण्याबद्दल काय सांगतात...कोणाला कशा शुभेच्छा देतात...क्रिकेटमध्ये भारतानं सामना जिंकला...तर आनंदी होऊन काय लिहितात...या सगळ्याची आजही चर्चा होते.
लता मंगशेकर यांचा वाढदिवस साजरा गानरसिकांनी राज्यात निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यातला मुख्य सोहळा मुंबईत रवींद्र नाट्यमंदिर येथे होत असून त्यात दिवसभर लता मंगेशकर यांच्या गाण्याचा स्वरयज्ञ सुरू राहणार आहे. त्याच कार्यक्रमात लतादीदींवरील ‘लता’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी ४.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमास अनेक मान्यवरांसोबत सर्व मंगेशकर कुटुंबीयही सहभागी होत आहेत. त्यात त्या स्व:त उपस्थित राहतात का, याकडे आता गानरसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.