मुंबई - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना रविवारी शिवाजी पार्क येथे साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. या अंत्यविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील दिग्गजांची उपस्थिती होती. कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, सिनेमा अशा विविधांगी क्षेत्रातील दिग्गज लतादीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. यावेळी, उपस्थित राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील बाप-लेकीच्या नात्याचा गोडवा सांगणारा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्कवर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेतच्या पहिल्या रांगेत बसलेल्या दिग्गज नेत्यांमध्ये शरद पवार हेही होते. त्यावेळी, लतादीदींचे अंत्यदर्शन घेण्यासाठी जाताना शरद पवार यांनी पायातील बूट खाली काढले होते. त्यानंतर, पुन्हा जागेवर बसण्यासाठी येताच सुप्रिया सुळे लगेचच त्यांच्याजवळ पोहोचल्या. त्यावेळी, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक बंध दर्शवणार क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.
खासदार सुप्रिया सुळे यांनी वडिल शरद पवार यांच्या पायातील बुटांचे बंध बांधल्याचे दिसून आले. त्यावेळी, डाव्या बाजूला शेजारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बसलेले होते. तर, उजवीकडे देवेंद्र फडणवीस उभारलेले दिसत आहेत. फडणवीस यांच्याशी शरद पवारांनी संवादही साधल्याचे कॅमेऱ्यात दिसून आले. शरद पवार यांनी वयाची ऐंशीवी पार केली आहे. मात्र, आजही ते प्रत्येक सुख दु:खाच्या कार्यात सहभागी असतात. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा म्हणून त्यांच्या शब्दाला मोठं वजन आहे. खासदार सुप्रिया सुळे याही संसदपटू असून वडिलांच्या राजकीय शाळेत त्या तयार झाल्या आहेत. पण, राजकीय गुरू यापेक्षा कधीही बापमाणूस म्हणूनच शरद पवार यांच्याशी त्यांचं घट्ट नातं आहे.