मुंबई-
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं ब्रीच कँडी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लता दीदींची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीनं ब्रीच कँडी रुग्णालयात धाव घेतली आहे. राज ठाकरे रुग्णालयात पोहोचले आहेत. राज ठाकरे सध्या डॉक्टरांकडून लता दीदींच्या प्रकृतीची माहिती जाणून घेत आहेत. तसंच त्यांनी मंगेशकर कुटुंबीयांचीही भेट घेऊन विचारपूस केली.
लता मंगेशकर गेल्या २७ दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना न्युमोनिया झाला आहे. शिवाय कोरोनाचीही लागण झाली होती. त्यामुळे त्या अनेक दिवस व्हेंटिलेटरवर होत्या. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर दोनच दिवसांपूर्वी त्यांचं व्हेंटिलेटर काढण्यात आलं होतं. तसंच त्यांचा कोरोना अहवाल देखील निगेटिव्ह आला होता. पण आज सकाळी पुन्हा त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. त्यामुळे पुन्हा आयसीयूमध्ये शीफ्ट करुन व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. लता दीदींची प्रकृती चिंताजनक असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.