मुंबई - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे एक वर्ष कालावधीच्या शासकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमांतर्गत संगीत साधकांना भारतीय संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.
प्रभादेवीतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये असलेल्या भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, भारतीय बासरी वादन, तबला वादन, सतार वादन, पियानो/किबोर्ड वादन, संगीत निर्मिती, ध्वनी अभियांत्रिकी असे विविध विषयांवरील एक वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. संगीतकार-दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार आणि रविवार या दोन दिवशी भावसंगीताचे धडे दिले जाणार आहेत. महाराष्ट्र शासन आणि कला संचालनालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट डीओए डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्हीटी डॉट इन या संकेतस्थळावर या संदर्भातील अधिक माहिती मिळेल.