मुंबई – ज्येष्ठ गायिका, भारतरत्न लता मंगेशकर(Lata Mangeshkar) यांच्या निधनानं देश शोकसागरात बुडाला. लतादिदींच्या जाण्याने शासकीय दुखवटा जाहीर केला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लतादिदींना आदंराजली वाहिली. लता मंगेशकरांच्या पार्थिवावर मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसह राजकीय क्षेत्रातील मान्यवर, बॉलिवूडमधील अनेकांनी अंत्यदर्शनाला हजेरी लावली.
मुंबईच्या पेडर रोड येथील प्रभुकुंजपासून दादरच्या छ. शिवाजी पार्कपर्यंत लता मंगेशकर यांची अंत्ययात्रा निघाली. यावेळी प्रचंड बंदोबस्त होता. मात्र या सर्व कार्यक्रमात काँग्रेसचे भाई जगताप वगळता इतर कोणतेही नेते नव्हते. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. आता या प्रकरणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
नाना पटोले(Nana Patole) म्हणाले की, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख हे सर्वजण कोरोना बाधित आहेत त्यामुळे ते रविवारी लता दिदींच्या अंत्यदर्शनाच्या ठिकाणी हजर राहू शकले नाहीत. माझ्या बहिणीच्या सासूसुद्धा वारल्यामुळे मी तिकडे होतो, आमचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप लता मंगेशकरांच्या अंत्यसंस्कारावेळी हजर होते. महाराष्ट्रात सध्या तालुक्यात काँग्रेस कमिटीच्या लोकांना आम्ही सूचना दिल्यात. काँग्रेसतर्फे रविवारी सर्व ठिकाणी लतादीदींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
त्याचसोबत मुंबईचे पालकमंत्री असलम शेख सुद्धा मुंबईबाहेर होते. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड मुंबईबाहेर होत्या. शनिवार रविवारमुळे अनेकांची दौरे होते. अनेकांना कनेक्टिव्हिटी नव्हती त्यामुळे आम्ही पोहोचू शकलो नाही. लतादिदी या काँग्रेस परिवारातल्याच होत्या. त्यांचे योगदान एवढे मोठे आहे. आता मी लतादिदींच्या परिवाराचे सांत्वन करायला जाणार आहे अशी माहिती नाना पटोलेंनी दिली.
लता मंगेशकरांचं स्मारक छ.शिवाजी पार्कवर व्हावं
लतादिदी यांचं स्मारक हे शिवाजी पार्कलाच व्हावं आणि चांगल्या दर्जाचं व्हावं, आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावं. देशातून आणि जगातून येणाऱ्या लोकांना लतादीदींच्या स्मारकाला गेल्यानंतर लतादीदींचा गोड आवाज कालच्या, आजच्या आणि उद्याच्या पिढीला स्मरणात राहील अशा दर्जाचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये व्हावं ही काँग्रेसची भूमिका असल्याचं नाना पटोलेंनी सांगितले.
...म्हणून उड्डाणपूल पेडर रोडला झाला नाही
लतादीदी यांनी पेडर रोडच्या उड्डाणपुलाचा जेव्हा विषय आला होता तेव्हा त्यांनी मला डिस्टर्ब होईल म्हणून सांगितलं होतं. त्यावेळी आघाडीचे सरकार होतं आणि तेव्हा आम्ही निर्णय घेतला आणि उड्डाणपूल पेडर रोडला झाला नाही असा किस्साही नाना पटोलेंनी सांगितला.