शासकीय संगीत महाविद्यालयाचे लता मंगेशकरांचे स्वप्न पूर्ण होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 01:01 PM2022-02-08T13:01:44+5:302022-02-08T13:02:25+5:30
विद्यापीठ प्रशासनाकडून अधिसभेत विद्यापीठाकडून संगीत महाविद्यालय उभारले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र कार्यवाही झाली नाही. मुंबई विद्यापीठ प्रशासनाला यासंदर्भात माहिती विचारली असता, याबाबत स्पष्टीकरण मिळू शकले नाही.
मुंबई : मुंबईत ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय’ सुरू करण्याचे लता मंगेशकर यांचे स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे. कलिना संकुलातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील शासकीय ग्रंथालयांची जागा या महाविद्यालयासाठी देण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतला असून, ट्विटद्वारे या संदर्भातील माहिती त्यांनी दिली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या जागा देण्याच्या चालढकलीमुळे अखेर शासकीय ग्रंथालयाच्या जागेत हे महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास, विकास, प्रसार व प्रचार व्हावा यासाठी सुसज्ज व अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शासकीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचे स्वप्न लता मंगेशकर यांचे होते. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडे त्यांनी प्रस्ताव पाठवून मुंबई विद्यापीठात कालिना संकुलातील जागेची महाविद्यालयासाठी मागणी केली होती. मात्र १० महिने उलटूनही मुंबई विद्यापीठाकडून सकरात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
विद्यापीठ प्रशासनाकडून अधिसभेत विद्यापीठाकडून संगीत महाविद्यालय उभारले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र कार्यवाही झाली नाही. मुंबई विद्यापीठ प्रशासनाला यासंदर्भात माहिती विचारली असता, याबाबत स्पष्टीकरण मिळू शकले नाही.
लता मंगेशकर यांच्या अखेरच्या दिवसांत त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाला योगदान देता आले नाही, हे खेदजनक आहे. विद्यापीठाच्या वेळ काढूपणामुळे अखेर शासकीय ग्रंथालयाच्या जागेचा वापर संगीत महाविद्यालयासाठी करण्यात येणार आहे. - प्रदीप सावंत, सिनेट सदस्य, युवासेना
...दीदींचे स्वर घुमत असत
लतादीदी रुग्णालयात यायच्या त्यावेळेस रुग्णालय कर्मचारी दीदींच्या आवाजातील भजने, भक्तीपूर्ण गाणी लावत असत. संपूर्ण रुग्णालयात दीदींचा मधुर स्वर घुमत असे. त्यात गणपतीची गाणी, महामृत्युंजय श्लोक यांचा समावेश असे. दीदीही आवाज ओळखून कर्मचाऱ्यांकडे पाहत स्मितहास्य करीत असत, अशी आठवण डॉक्टरांनी सांगितली.