Join us

लतादीदींच्या पहिल्या गाण्याला ७९ वर्षे पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 4:50 AM

गेली आठ दशके ज्यांच्या स्वरांची मोहिनी गानरसिकांवर आहे, त्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या रेडिओवरील पहिल्या गाण्याला बुधवारी ७९ वर्षे पूर्ण झाली.

मुंबई : आयुष्यभर कष्ट सोसणाऱ्या बाबांनी देवदुर्लभ संगीत प्रतिभेचा कल्पवृक्ष आपल्या कन्येसाठी लावला. या कन्येनेही कोट्यवधी रसिकांच्या आयुष्यात स्वर्गीय सुरांचे आनंदाचे मळे फुलवले आणि आपल्या बाबांच्या समृद्ध वारशाचा ‘वेलु गगनावरी’ नेला. त्याबद्दल ‘आता आपल्याला कसलीही चिंता उरली नाही’ असे कृतार्थ उद्गार बाबांनी काढले. हे थोर बाबा म्हणजे प्रसिद्ध दिवंगत गायक, संगीतकार दीनानाथ मंगेशकर... आणि त्यांची कन्या म्हणजे, गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी लत मंगेशकर! खुद्द लतादीदींनीच वडिलांची ही ‘भरून पावल्याची’ भावना समाजमाध्यमांवर शेअर केली.गेली आठ दशके ज्यांच्या स्वरांची मोहिनी गानरसिकांवर आहे, त्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या रेडिओवरील पहिल्या गाण्याला बुधवारी ७९ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त दस्तरखुद्द लता मंगेशकर यांनीच ही माहिती समाज माध्यमांमध्ये उघड केली.“१६ डिसेंबर, १९४१ रोजी मी रेडिओवर प्रथमच दोन नाट्यगीते गायली. जेव्हा माझ्या वडिलांनी ती गाणी ऐकली, तेव्हा ते खूप खूश झाले. त्यांनी माझ्या आईला सांगितलं की, लताला आज रेडिओवर ऐकून मला खूप आनंद झाला. आता मला कसलीही चिंता नाही,” अशा शब्दांत लता मंगेशकर यांनी त्या दिवसाची आठवण सांगितली आहे.एप्रिल, १९४२ मध्ये दीनानाथांचे अकाली निधन झाले. मंगेशकर परिवाराची जबाबदारी लता मंगेशकर यांच्यावर आली. त्यांचे संगीत नाटक सुटले. मग सिनेमातील भूमिका आणि गाणी सुरू झाली. पुढे सगळा इतिहास गानरसिकांच्या साक्षीने घडला आणि दीनानाथांचे ‘आता कसलीही चिंता नाही’  हे उद्गार गेली आठ दशके तंतोतंत खरे उतरले आहेत.‘वन्स मोअर’ही मिळवलारेडिओवर गाण्यापूर्वी लता मंगेशकर यांनी वडील दीनानाथ मंगेशकर यांच्यासोबत नाटकातून छोट्या-छोट्या भूमिका करण्यास सुरुवात केली होती. १९३८-३९मध्ये त्यांच्या बलवंत संगीत मंडळीच्या ‘सौभद्र’ या नाटकाचा प्रयोग होता. त्यात नारदाची भूमिका करणारा नट आजारी पडला, तेव्हा लता मंगेशकर यांनी ती भूमिका केली. त्यावेळी त्यांचे वय होते नऊ वर्षांचे. ‘राधाधर मधुमिलिंद’ आणि ‘पावना वामना’ ही पदे गायली. एवढेच नव्हे, तर प्रत्यक्ष दीनानाथांच्या देखत ‘वन्स मोअर’ही मिळविला.

टॅग्स :लता मंगेशकर