लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर ही मोठी माणसे आहेत. एकच हॅशटॅग वापरून केंद्र सरकारने त्यांना ट्विट करायला लावणे अयोग्य होते. अशा मोठ्या मंडळींची प्रतिष्ठा केंद्र सरकारने पणाला लावणे चुकीचे आहे. हा सरकारच्या धोरणांचा विषय होता, देशाचा नव्हे. आता टीकेचे धनी ही मोठी मंडळी होत आहेत, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.
राज ठाकरे शनिवारी ठाण्यात पक्षांतर्गत बैठकीसाठी आले होते. माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, ज्या पॉप सिंगरच्या ट्विटमुळे हा वाद निर्माण झाला त्या रिहानावरही राज यांनी जोरदार टीका केली. रिहाना ही कोण बाई? तिने ट्विट करण्याआधी ती कोणाला माहीत होती का? या बाईला सरकार उत्तर देतंय की, आमच्या देशाचा प्रश्न आम्ही सोडवू. मग, ‘अगली बार ट्रम्प सरकार’ अशी भाषणे अमेरिकेत करण्याची गरज नव्हती, तो त्यांच्या देशाचा प्रश्न होता. कृषी कायदा चांगला आहे, फक्त तो एक-दोन जणांच्या फायद्याचा ठरू नये, असेही राज म्हणाले.
शेतकरी आंदोलन इतके चिघळण्याची गरज नव्हती. सरकारने आणलेला कृषी कायदा चुकीचा नाही. त्याच्यात निश्चित त्रुटी असतील. परंतु केंद्राने प्रत्येक राज्याचा विचार करून राज्यांशी चर्चा करून या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. प्रत्येक राज्याची कृषिधोरणे वेगवेगळी आहेत. प्रत्येक राज्यातील कृषिमंत्री, मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून केंद्राने निर्णय घेतला पाहिजे, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. चीन-पाकिस्तान सीमेवर जितका बंदोबस्त नसेल तितका बंदोबस्त शेतकरी आंदोलनात ठेवला आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने समजून घेतल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.
राज ठाकरे उवाच:
- अयोध्येला जाण्याची इच्छा मी व्यक्त केली. मात्र तेथे जाण्याची तारीख निश्चित केलेली नाही, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
- वाढत्या इंधन दरवाढीबाबत राज म्हणाले की, वीजदरवाढीविरोधात सरकार निर्णय घेत नाही ते इंधन दरवाढीविरोधात काय घेणार? एकीकडे शिवसेना इंधन दरवाढीविरोधात, तर दुसरीकडे भाजप वीजबिलवाढीविरोधात आंदोलन करीत आहे. हा लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. भाजपला आंदोलन करण्याची काय गरज? केंद्रात त्यांचे सरकार आहे, त्यांनी केंद्राशी बोलावे.
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यावर त्यांनी आम्हाला शरद पवार यांना भेटायला सांगितले. पवार यांना भेटल्यावर त्यांनी आम्हाला वीज कंपन्यांच्या नावाने पत्र देण्यास सांगितले. अदानी, टाटा वगैरे वीज कंपन्यांशी पवार बोलणार होते. परंतु लागलीच गौतम अदानी यांनी पवार यांची त्यांच्या घरी भेट घेतली आणि वीजबिल माफ केले जाणार नाही, असे सरकारने जाहीर केले, असा आरोप ठाकरे यांनी केला.