मुंबई: मालाडच्या आप्पापाडाजवळील पोईसर नदी रुंदीप्रकरणी बाधित झोपडीधारकांचे पुनर्वसन राहत्या परिसरातच करण्यात यावे, त्यांच्यावर अन्याय होऊ नये, या मागणीसाठी आ. विद्या चव्हाण यांनी आझाद मैदानात ‘लाटणे’ मोर्चाचे आयोजन केले.अप्पापाडा, पटेल कंपाउंड, सईबाईनगर, आनंदनगर, गोकुळनगर, गांधीनगर या ठिकाणच्या झोपडीधारकांना सुरुवातीला पुनर्वसनात चटई क्षेत्र २२५ चौ. फूट देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, नवीन शासन नियमांनुसार ते २६९ चौ.फूट असणे गरजेचे आहे. पुनर्वसन याच परिसरात चार किलोमीटर क्षेत्रात होणे गरजेचे आहे. मात्र, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यात पालिका, स्थानिक आमदार, नगरसेवक यांच्या दबावाखाली हे सर्व होत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. या सगळ्याविरुद्ध त्यांनी ‘लाटणे’ मोर्चाचे आयोजन केले होते.या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, तसेच मालाड विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव भरडकर, सुरेश यादव, कमलेश यादव, बाबुलाल यादव, मारुती नलावडे, चिंतामणी यादव, संजय लोकरे, शामसुंदर सावंत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता.
झोपडीधारकांचा आझाद मैदानात ‘लाटणे’ मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 2:02 AM