लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
एरवी दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल जून महिन्यात जाहीर होऊन त्यानंतर अनुक्रमे अकरावी आणि बारावीनंतरच्या प्रवेशप्रक्रियांची सुरुवात होत असते. विशेषतः बारावीच्या निकालानंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, वैद्यकशास्त्र, एलएलबी तसेच आर्किटेक्चरसारख्या अभ्यासक्रमांची सीईटी होते, जेईई, नीटसारख्या केंद्रीय पातळीवरील परीक्षा होतात आणि मग प्रवेश होतात; मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षाच पुढे ढकलण्यात येणार असल्याने पुढील हे सारे शैक्षणिक कॅलेंडर कोलमडून पडण्याची भीती व्यक्त होत आहे. यंदा मार्च महिन्यापर्यंत चाललेल्या अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला ही पुढील वर्षी असाच फटका बसण्याची भीती पालकांकडून व्यक्त होत असून, याचा थेट परिणाम त्यांच्या चालू शैक्षणिक वर्षातील अभ्यासावर होण्याची भीती पालक व्यक्त करत आहेत. शैक्षणिक वर्षच उशिराने सुरू होताना अभ्यासक्रम तरी कसा वेळेत पूर्ण करणार, असा प्रश्न शिक्षक आणि प्राध्यापकही करीत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलून त्या आता मे, जूनमध्ये घेण्यात येणार आहेत. त्यामुळे साहजिकच यांचा निकाल प्रचलित पद्धतीनुसार ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अपेक्षित आहे. नेहमीच्या पदवी प्रवेशाच्या शैक्षणिक वेळापत्रकाचा अंदाज घेतल्यास तोपर्यंत निम्म्याहून अधिक प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली असते; मात्र यंदा ती सुरूच सप्टेंबरमध्ये होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. राज्य सीईटी परीक्षाचे वेळापत्रक राज्य मंडळाच्या वेळापत्रकाप्रमाणे बदलण्यात जरी आले तरी जेईई, नीटसारख्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियांचे काय? असा प्रश्न पालक व विद्यार्थी उपस्थित करीत आहेत. दहावी, बारावीच्या लेट परीक्षांचा फटका केवळ पदवी परीक्षांना नाही तर दहावीनंतरच्या आयटीआय, पॉलिटेक्निक अशा अभ्यासक्रमांनाही बसणार आहे. त्यामुळे एक तर शासनाने देशभरातील प्रवेश प्रक्रियांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकच धोरण राबविण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा शैक्षणिक राज्य मंडळाच्या परीक्षांना विलंब झाला तरी त्याचे प्रवेशाचे शैक्षणिक कॅलेंडर बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी, असे मत महाविद्यालयीन प्राध्यापक व्यक्त करीत आहेत.
शिक्षण विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि शिक्षणतज्ज्ञ यांनी या सर्व घोळावर एकत्रित तोडगा काढणे आवश्यक असल्याचे मत पालक व्यक्त करीत आहेत. दहावी, बारावी परीक्षा पुढील नियोजनानुसार वेळेवर झाल्याचं तर ऑनलाइन मूल्यांकन, निकालाचा कालावधी, प्रवेश प्रक्रियाचा कालावधी यांमध्ये कपात करून शैक्षणिक वर्ष सुरळीत पद्धतीने करता येते का? यावर अभ्यास करणे आणि आतापासून कृती आराखडा तयार करणे आवश्यक असल्याचे मत पालक व तज्ज्ञ मांडत आहेत.