दिवंगत जयवंत परब यांच्यात खिळाडू वृत्ती होती - आमदार अमित साटम
By मनोहर कुंभेजकर | Published: January 4, 2024 06:58 PM2024-01-04T18:58:34+5:302024-01-04T18:58:46+5:30
मला स्वतःला कोविड झाल्याने त्यांचे शेवटचे अंत्यदर्शन मी घेऊ शकलो नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
मुंबई - मालवणी जत्रोत्सवाचे जनक,भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस,माजी नगरसेवक दिवंगत जयवंत परब यांच्या संकल्पनेतून अंधेरी पश्चिम,डी. एन.नगर येथे मालवणी जत्रोत्सव सुरू शुक्रवार दि,29 डिसेंबर ते दि,7 जानेवारी पर्यंत अंधेरी पश्चिम,डी. एन.नगर,इमारत क्रमांक 30 समोर,महात्मा ज्योतिबा फुले मैदानात सध्या जल्लोषात सुरू आहे. स्व.जयवंत परब फाउंडेशन आयोजित मालवणी जत्रोत्सवाला अंधेरी पश्चिम विधानसभेचे आमदार अमित साटम यांनी भेट दिली. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक प्रकाश परब यांनी त्यांचा शाल, सन्मानचिन्ह देवून त्यांनी सत्कार केला.
यावेळी मंचाकावर शिवसेनेचे अंधेरी पश्चिम उपविभागप्रमुख व माजी नगरसेवक संजय पवार, राष्ट्रीय चर्मकार संघाचे मुंबई अध्यक्ष राजू नेटके, सचिव प्रसाद परब, माजी नगरसेवक अशोक जाधव, प्रदीप कुरतडकर इतर मान्यवर आणि शिवसैनिक आणि अंधेरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार अमित साटम म्हणाले की,दिवंगत जयवंत परब हे माझ्या विरोधात 2014 साली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अंधेरी पश्चिमचे उमेदवार होते. आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलो तरी ते आवर्जून 2-3 दिवसांनी रात्री फोन करत असत. मी जिंकल्यानंतर देखिल आणि 2019 मध्ये पुन्हा विजयी झाल्यावर त्यांनी आवर्जून फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या अशी त्यांच्यात खिलाडूवृती होती. त्यांचे अंधेरीत काम खूप होते. नुसते कार्यालयात बसून जयवंत परब होता येत नाही असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. त्यांचे दि,19 सप्टेंबर 2020 ला निधन झाले. मात्र मला स्वतःला कोविड झाल्याने त्यांचे शेवटचे अंत्यदर्शन मी घेऊ शकलो नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.