गोपीनाथ मुंडेंचा फोटो नसल्याने नाराजी; भाजपाच्या महामेळाव्यात अंतर्गत धुसफूस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 12:35 PM2018-04-06T12:35:34+5:302018-04-06T12:35:34+5:30
कार्यक्रमात भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत धुसफूस पाहायला मिळते आहे.
मुंबई- भाजपाच्या 38 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईच्या एमएमआरडीए ग्राऊंडवर आज भाजपाच्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या महामेळाव्यासाठी राज्यभरातून भाजपाचे कार्यकर्ते हजेरी लावताना दिसत आहे. पण या कार्यक्रमात भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत धुसफूस पाहायला मिळते आहे. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक भाजपावर नाराज असल्याचं मेळाव्यात पाहायला मिळतं आहे.
भाजपाच्या या कार्यक्रमातील एकाही पोस्टरवर, स्टेजवर मुख्य मंडपामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नाही. गोपीनाथ मुंडे यांचा विसर पडल्याने बीडचे मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी झळकत असलेल्या पोस्टर्सवरून गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नसल्याने मुंडे समर्थकांनी सभास्थळी घोषणाबाजी सुरू केली. गोपीनाथ मुंडे यांचा फोटो पोस्टरवर लावण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे.
'राज्यातील भाजपा पक्ष हा गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आहे, मात्र इथे मात्र त्यांचा फोटोही बॅनरवर नाही. भाजपाने बॅनरवर त्यांचा फोटो लावावा,' अशी मागणी मुंडे समर्थकांनी केली. दरम्यान, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी नाराज कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांनी कार्यकर्त्यांना मंचावरून शांत करण्याचा प्रयत्न केला.