एसटी कर्मचाऱ्यांचा लागणार लेटमार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:06 AM2020-12-06T04:06:49+5:302020-12-06T04:06:49+5:30
कार्यालयीन वेळांचे पालन गरजेचे : तीन दिवस उशिरा आल्यास एक अनुपस्थिती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एसटी महामंडळ आता ...
कार्यालयीन वेळांचे पालन गरजेचे : तीन दिवस उशिरा आल्यास एक अनुपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एसटी महामंडळ आता जे कर्मचारी वेळेवर कामावर येत नाहीत, नेहमी उशिरा येतात तसेच वेळेआधीच घरी जातात त्यांचा रेकॉर्ड ठेवणार असून ‘ना काम, ना दाम’ या तत्त्वानुसार त्यांचा हिशेब होणार आहे. कामावर दहा मिनिटे उशिरा आल्यास त्या दिवसाचा लेटमार्क लावण्यात येईल. याप्रमाणे तीन दिवस उशिरा आल्यास एक अनुपस्थिती लावण्यात येईल. याबाबतचे आदेश एसटी महामंडळ महाव्यवस्थापकांनी दिले आहेत.
एसटी महामंडळामधील कर्मचारी वर्ग-३साठी सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ५.३० आणि वर्ग-४साठी सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६ अशी कार्यालयीन वेळ आहे. वर्ग-३ मधील कर्मचाऱ्यांना सकाळी ९.५५ आणि वर्ग-४ मधील कर्मचाऱ्यांना सकाळी ९.३५ वाजता हजेरीपत्रक बंद करण्यात येईल. तसेच वर्ग-३ चे कर्मचारी सकाळी ९.५५ पर्यंत आणि वर्ग-४ चे सकाळी ९.४५ वाजेपर्यंत तर, वर्ग-३ चे कर्मचारी सकाळी ९.५५ आणि वर्ग-४ चे सकाळी ९.४५ वाजेपर्यंत हजेरीपटावर सही करू शकतात. त्यानंतर येणाऱ्यांना हजेरीपटावर सही करण्याची परवानगी नाही. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांची त्या दिवशी रजा गृहीत धरण्यात येईल. विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची त्या दिवशी अनुपस्थिती ग्राह्य धरली जाईल.
* ...तर एक नैमित्तिक रजा कापणार
कामावर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तीन वेळा लेटमार्क लागल्यास त्याची एक नैमित्तिक रजा कापण्यात येणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांची नैमित्तिक रजा शिल्लक नसेल त्यांची अर्जित रजा कापण्यात येणार आहे.
..........................