State Government ( Marathi News ) : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अद्याप हा विस्तार झालेला नाही. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तीन नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारासह अधिवेशनाला सामोरे जाण्यासाठीच्या रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती आहे.
राज्यातील गुन्हेगारीच्या घटना तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांकडून अधिवेशन काळात राज्य सरकारला हेरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विरोधकांच्या या हल्ल्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं, याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये खलबतं झाल्याचे समजते. तसंच विधानपरिषद निवडणुकीबाबतही या नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.
शेवटचेच अधिवेशन
अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच आज मतदारसंघातून विधान परिषदेवर पाठवावयाच्या चार जागांसाठी मतदान होत आहे. या निकालाचे पडसादही अधिवेशनात उमटतील. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे १२ जुलैला विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास २५ जूनपासून सुरुवात होणार असल्याने या निवडणुकीच्या निमित्ताने विधीमंडळ अधिवेशनातही राजकारण जोरात असेल. अधिवेशनानंतर विधानसभा निवडणुकीचे वेध लागतील.
अर्थसंकल्प सादर होणार
कापूस, सोयाबीन पिकाला न मिळालेला भाव, कांदा प्रश्न, सरकारने निर्णय घेतले पण त्यांची अंमलबजावणी झालेली नाही, असे मुद्देही विरोधकांची आयुधे असतील आणि त्या आधारे सत्तापक्षाची कोंडी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मार्चमध्ये झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने वित्तमंत्री अजित पवार यांना पूर्ण अर्थसंकल्प मांडता आलेला नव्हता, त्यांनी केवळ लेखानुदान सादर केले होते.
दरम्यान, आगामी अधिवेशनात ते अर्थसंकल्प सादर करतील. विधानसभा निवडणूक साडेचार महिन्यांवर असताना या अर्थसंकल्पात लोकहिताच्या योजनांचा वर्षाव असेल, असे मानले जात आहे. त्याचवेळी महायुती सरकारचे काही घोटाळे अधिवेशनात बाहेर काढण्याची तयारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार करीत आहेत.