स्वर्गीय वसंतदादा पाटील हे राजकारणाच्या पलीकडे पाहू शकणारे व्यक्तिमत्व - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 08:58 PM2017-10-10T20:58:13+5:302017-10-10T20:58:29+5:30
मुंबई : स्वर्गीय वसंतदादा पाटील हे राजकारणाच्या पलीकडे पाहू शकणारे असे व्यक्तिमत्व होते. स्वातंत्र्यसेनानी होते. कुठल्याही प्रकारची चिंता न बाळगता ते आपल्या तत्वांवर, विचारांवर जीवन जगले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केले.
पद्मभूषण स्व. वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे प्रमुख राजा माने लिखित 'महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा' डिजीटल बुक व ऑडिओ बुकचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख उपस्थित होते.
वसंतदादांचे कार्य हे महाराष्ट्रपुरतेच नव्हे तर जगातील प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचावे यासाठी केलेले राजा माने यांनी लिहिलेले डिजिटल बुक महत्वपूर्ण आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, वसंतदादांच्या जन्मशताब्दीचा ठराव विधानमंडळात मांडताना त्यांच्या जीवनाचे पैलूचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. राजा माने यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे वसंतदादांच्या जीवनातले अनेक प्रसंग नव्याने समोर येतील.
गोरगरिबांसाठी अनेक निर्णय घेत त्यांनी विविध क्षेत्रात प्रचंड मोठे कार्य केले. यामुळेच महाराष्ट्रातील उत्तुंग व्यक्तिमत्वात दादांचा समावेश होतो. समाजाच्या कामामध्ये कायदा, नियम यांचा विचार न करता समाजहिताचे काम केले
उच्च शिक्षणाचा विस्तार त्यांनी केला. त्यांनी खासगी वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिल्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची मुले डॉक्टर, अभियंते झाली. कालांतराने उच्च शिक्षणाच्य क्षेत्रात चुकीच्या प्रवृत्ती आल्या मात्र सरकारने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
स्व. वसंतदादांनी महाराष्ट्रासाठी खूप मोठे कार्य केले आहे असे सांगून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील मातृभूमी प्रतिष्ठान आपल्या तालुक्यासाठी करत असलेले कार्य मोठे आहे. माणूस घडवण्याचे काम मातृभूमी प्रतिष्ठान च्या माध्यमातून होत आहे, असे कौतुकाचे उद्गारही त्यांनी काढले.
राजेंद्र दर्डा म्हणाले की, क्रांतीकार्य करणारे वसंतदादा, सर्वसामान्यांचे वसंतदादा, मुख्यमंत्री म्हणून कुशल प्रशासक म्हणून काम केलेले वसंतदादा असे अनेक पैलू समोर आणणारे पुस्तक राजा माने यांनी ओघवत्या भाषेत लिहिले आहे. दादांचे शिक्षण कमी होते मात्र त्यांचे सामान्य ज्ञान प्रचंड होते. जनतेची नाडी त्यांना पूर्ण माहीत होती. स्वाभिमानी, विचारांचे पक्के होते, असेही दर्डा म्हणाले.
राजा माने याप्रसंगी म्हणाले की, लोकनेते म्हणून वसंतदादांची जनतेला ओळख आहे. मात्र तुरुंग फोडून पळालेले क्रांतिकारी दादा, 55 व्या वर्षी राजकीय जीवनात प्रवेश केलेले दादा, त्यांचे मूळ गाव, जन्मठिकाण आदी माहिती खूप कमी लोकांपर्यंत असल्याने हे पुस्तक लिहिले अशी या पुस्तक लेखनामागील पार्श्वभूमी त्यांनी स्पष्ट केली.