Join us

गार्बेटवाडीच्या नशिबी डबक्याचे पाणी

By admin | Published: April 24, 2015 10:43 PM

केवळ ३० घरांची लोकवस्ती, तरीही या डोंगरकपारीतील आदिवासींना आयुष्य जगवण्यासाठी आणि तहान भागवण्यासाठी गेली अनेक वर्षे निव्वळ संघर्षच करावा लागत आहे.

राहुल देशमुख, नेरळकेवळ ३० घरांची लोकवस्ती, तरीही या डोंगरकपारीतील आदिवासींना आयुष्य जगवण्यासाठी आणि तहान भागवण्यासाठी गेली अनेक वर्षे निव्वळ संघर्षच करावा लागत आहे. माथेरानच्या डोंगररांगांतील या गार्बेटवाडीला माथेरानच्या नळपाणी योजनेतून पाणी मिळत होते. मात्र नव्या योजनेमुळे हे पाणीही मिळणे सध्या कठीण झाले आहे. या आदिवासींच्या नशिबी पुन्हा डबक्याचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. माथेरानच्या डोंगररांगांत गार्बेटवाडीतील लोक वर्षानुवर्षे दगडामधील पाणी साठवून ते पितात. पूर्वी त्यांना माथेरान नळपाणी योजनेच्या जुन्या जलवाहिनीतून पाणी मिळायचे, परंतु नवीन योजनेतून पाणी देण्यास विरोध होत आहे. गार्बेटवाडी ही नेरळ - माथेरान घाटात आणि माथेरान या पर्यटन ठिकाणच्या अगदी समांतर रेषेत ही वाडी आहे. मात्र रस्ता करता येत नसल्याने कोणतेही वाहन जात नाही.येथील ग्रामस्थांनी डोंगर रांगांतील दोन ठिकाणी कपारीतील दोन डोह शोधले आहेत. गाणी डोहाच्या ठिकाणी नैसर्गिक झऱ्यातील पाणी मिळत असल्याने हे आदिवासी ते पिण्यासाठी वापरतात. तो झरा वाडीच्या खालच्या म्हणजे दरीकडील बाजूला आहे. तेथे जाण्यासाठी दोनशे मीटरचे अंतर कापावे लागते. डोहाकडे जाताना उतार आणि पुन्हा पाणी घेऊन जाताना तीव्र चढाव अशीच येथील स्थिती आहे, तर दुसरा डोह हा कोयाचा डोह म्हणून ओळखला जातो. हे पाणी जनावरे व घरगुती वापरासाठी वापरले जाते. नळपाणी योजनेअभावी पाण्यासाठी पुन्हा पायपीट करावी लागणार असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे.