Join us

लाइट वेट स्वेटर्सकडे तरुणाईचा कल

By admin | Published: December 09, 2015 12:44 AM

अलीकडे शहरामध्ये कमी होत चाललेली थंडी व फॅशनची तरुणाईमध्ये वाढती क्रेझ लक्षात घेता हिवाळ्यात ऊब देणारे स्वेटर्स फॅशनेबल होत चालले आहे.

प्रज्ञा म्हात्रे, ठाणेअलीकडे शहरामध्ये कमी होत चाललेली थंडी व फॅशनची तरुणाईमध्ये वाढती क्रेझ लक्षात घेता हिवाळ्यात ऊब देणारे स्वेटर्स फॅशनेबल होत चालले आहे. केवळ थंडीपासून संरक्षण म्हणून स्वेटर्स घालणे, हा उद्देशच बाद होऊन फॅशन म्हणूनच स्वेटर्सकडे पाहिले जात आहेत. स्वेटर्सचे ओझे सांभाळायला लागू नये म्हणून तरुणाई लाइट वेट स्वेटर्सकडे वळू लागली आहे. केवळ एक-दोन नव्हे तर त्यापेक्षाही अधिक स्वेटर्स घेणे तरुणाई पसंत करू लागली आहे.थंडी पडली की स्वेटर, शाल, मफलर, टोपी असे गरम कपडे कपाटांतून बाहेर येतात. पूर्वी लोकरीचेच स्वेटर्स बाजारात विक्रीसाठी येत. कपाटात घडी करून ठेवायचे म्हटले तरी हे जाड स्वेटर ठेवायचे कुठे, असा प्रश्न पडत असे. बाहेर जायचे तरी या स्वेटर्सचे ओझे विनातक्रार सांभाळावेच लागायचे. हे स्वेटर्स मर्यादित रंगांमध्ये, मर्यादित प्रकारांमध्ये उपलब्ध असत. परंतु, आता स्वेटर्सला फॅशनची जोड मिळाल्याने बाजारात लाइट वेट स्वेटर्स मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. यात स्मार्ट आणि फॅशनेबल लूकसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, अलीकडे थंडी कमीच होत असल्याने तसेच जुने स्वेटर्स घरात असले तरी शाळा, आॅफिसला जाताना, बाहेर जाताना जरा चांगले, नवीन फॅशनचे स्वेटर किंवा जॅकेट घालावेसे वाटतातच. त्यामुळेच तरुणाईमध्ये लाइट वेट स्वेटर्सची क्रेझ वाढू लागली आहे. थंडीपासून संरक्षणापेक्षा फॅशनला अधिक महत्वतरुणाईची पसंती पाहता बाजारातही या स्वेटर्सचाच बोलबाला आहे. तरुणाईचा स्वेटर्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्यामुळे लाइट वेट स्वेटर्स हे थंडीपासून संरक्षणापेक्षा फॅशन म्हणूनच पाहिले जात आहे. जुने स्वेटर्स घरात असले तरी फॅशनमुळे तरुणाई किमान दोन किंवा त्याहून अधिक स्वेटर्स घेणे पसंत करते. नारिंगी, रॉयल ब्ल्यू, नेव्ही ब्ल्यू, फ्लोरोसन्स, पॅरोट ग्रीन, ब्लड रेड, मोरपंखी, बेबी पिंक, वाइन कलर, पर्पल अशा आकर्षक रंगांमध्ये हे स्वेटर्स मिळत असल्याने थंडी नसली तरी खरेदी करण्याचा मोह आवरत नाही. वुल, कॉटन आणि लिनन यांपासून हे स्वेटर्स बनविले जात असल्याने याचे वजन तर कमीच असते, परंतु हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण तर उन्हाळ्यात कूल वाटतात, असे फॅशन डिझायनर रोहिणी ढवळे हिने लोकमतशी बोलताना सांगितले.लोकरीच्या स्वेटर्सचे ओझे खूप असते, त्यामुळे आॅफिस किंवा कॉलेजला जाताना ते सांभाळणे अवघड व्हायचे. परंतु, आता लाइट वेट स्वेटर्समुळे लूकच बदलल्यामुळे व त्याचे ओझेही वाटत नसल्यामुळे तरुणाईचा कल लाइट वेट स्वेटर्सकडेच असल्याचे रोहिणीने सांगितले. विशेष म्हणजे स्वेटर्सबरोबर मफलरही वापरण्याचा ट्रेण्ड असल्याने विशेष स्वेटर्स आणि गळ्याभोवती मफलरची स्टाइल तरुणींमध्ये जास्त वापरात आहे. थंडीमध्ये टोपी घालण्याची स्टाइल पूर्वीपासून आहे. त्यामुळे स्वेटरलाच जोडून असलेल्या टोपीलाही पसंती देतात.