गोखले पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेला लेटमार्क? गर्डरचे भाग अद्याप मुंबईत नाहीत, डेडलाइन हुकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 11:16 AM2024-08-01T11:16:46+5:302024-08-01T11:19:06+5:30
३१ जुलैपर्यंत दुसऱ्या बाजूच्या गर्डरचे सगळे भाग एकत्रित करून येत्या ३१ सप्टेंबरपर्यंत गर्डर स्थापन करण्याचे नियोजन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले होते.
मुंबई :अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाची उत्तरेकडील मार्गिका मुंबईकरांसाठी ४ जुलै रोजी खुली करण्यात आली असली तरी मुख्य पुलाच्या दक्षिण भागातील काम अद्याप रखडलेले आहे. या पुलाच्या जोडणीसाठी आवश्यक असलेले गर्डरचे सुटे भाग अजूनही मुंबईत दाखल झालेले नसल्याने दक्षिणेकडील मार्गिकेची ३१ सप्टेंबरची डेडलाइनदेखील हुकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यापूर्वी ३१ जुलैपर्यंत दुसऱ्या बाजूच्या गर्डरचे सगळे भाग एकत्रित करून येत्या ३१ सप्टेंबरपर्यंत गर्डर स्थापन करण्याचे नियोजन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले होते. गोखले पुलाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर एक बाजू १५ महिन्यांनी अर्थात २६ फेब्रुवारीला सुरू करण्यात आली होती. एप्रिलच्या सुरुवातीला पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या गर्डरचे भाग दिल्लीहून मुंबईत आणण्यास सुरुवात झाली होती.
नियोजन फसले-
१) सर्व भाग आल्यानंतर ते जोडून ३१ मेपर्यंत गर्डर स्थापन करणे, पुलाचे पोहोच रस्ते तयार करणे आणि ३१ डिसेंबरपर्यंत संपूर्ण पूल वाहतुकीसाठी सुरू करणे असे नियोजन होते.
२) पुलाच्या गर्डरचे ३२ सुटे भाग २२ एप्रिलपर्यंत आणून ३० एप्रिलपासून पुलाची जोडणी सुरू करण्यात येणार होती. मात्र, अद्याप हे सर्व भाग आलेले नसल्याने गर्डर स्थापन करण्याचे कामच आता लांबणीवर पडले आहे.
गर्डरच्या सुट्ट्या भागांचा एक ट्रक अद्याप येणे बाकी आहे. ४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ पर्यंत तो मुंबईत पोहोचेल. त्यानुसार लगेचच पुढचे काम हाती घेण्यात येईल. दरम्यान दुसऱ्या बाजूची इतर कामे सुरू असल्याने आपण काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. - अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका
अखेर स्कायवॉक सुरू-
गोखले पूल चार लेनचा असून पश्चिम द्रुतगती महामार्ग अंधेरी पूर्व ते एस. व्ही. रोड अंधेरी पश्चिमेला जोडतो. फेब्रुवारीमध्ये अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारी एक मार्गिका खुली केली. ५ महिन्यांनंतर अंधेरी स्थानकावरून एसव्ही रोड मार्गे गोखले पुलाला जाणारा रस्ता आणि पादचारी स्कायवॉक बुधवारपासून सुरू केला आहे.
असा बसविणार गर्डर -
गर्डरचे सर्व सुटे भाग आल्यानंतरच गर्डर लाँचिंग करण्यात येईल. सुटे भाग जोडल्यानंतर रेल्वेकडून रुळांवरील कामांसाठी ब्लॉकदेखील घेतला जाईल. त्यानंतर गर्डर स्थापन करून पोहोच रस्त्याची कामे केली जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अंबाला येथील कारखाना हा रेल्वे प्रशासनाने प्रमाणित केलेला आहे. याआधी पालिकेकडून कंत्राटदाराला गर्डरचे सुटे भाग येण्यास उशीर का झाला, यासाठी कारणे दाखवा नोटीसही जारी करण्यात आली आहे.