मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली असली तरी मध्य रेल्वेची लोकल सेवा विलंबाने धावत आहे. गुरुवारी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना कार्यालयात पोहोचण्यासाठी लेटमार्क बसला आहे.
मुंबई आणि उपनगरात सोमवारपासून पावसाने काही प्रमाणात उसंत घेतली आहे. तरीही मध्य रेल्वे मार्गावर लोकल सेवा धिम्या गतीने धावत आहे. पाऊस नसला तरी, ढगाळ वातावरणामुळे हवेतील दृश्यमानता कमी होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मोटरमन आणि लोको पायलट रेल्वे गाड्यांचा वेग कमी करावा लागतो. यामुळे लोकल आणि रेल्वे गाड्यांचा वेगावर बंधने आली आहे.
सकाळी मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे प्रवाशांना दररोज लोकल विलंबाचा मोठा फटका बसत आहे.
- पाऊस असो किंवा नसो लोकलची वाहतूक नेहमीच उशिराने होत असल्याने प्रवासी, नोकरदार त्रस्त झाले आहेत. अनेकदा लोकल रद्द कराव्या होत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. रेल्वे सेवा कधी सुधारणार असा सवाल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला केला आहे. रात्रीच्यावेळी लोकल हमखास उशिराने धावत असल्याच्या तक्रारी या वेळी प्रवाशांनी केल्या. यात सुधारणा करण्याची मागणी होत आहे.