‘लातूर मेट्रो’ ब्रॅण्डनेमचे रेल्वे डबे देश-विदेशात जाणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 02:37 AM2018-02-21T02:37:03+5:302018-02-21T02:37:12+5:30
लातूर येथील कारखान्यात ‘लातूर मेट्रो’ या ब्रॅण्डनेमने तयार होणारे मेट्रो रेल्वेचे डबे विदेशात जाणार असून या प्रकल्पामुळे मराठवाड्याचा कायापालट होईल, असा विश्वास रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला.
मुंबई : लातूर येथील कारखान्यात ‘लातूर मेट्रो’ या ब्रॅण्डनेमने तयार होणारे मेट्रो रेल्वेचे डबे विदेशात जाणार असून या प्रकल्पामुळे मराठवाड्याचा कायापालट होईल, असा विश्वास रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला.
मॅग्नेटिक महाराष्टÑ गुंतवणूक परिषदेत मंगळवारी लातूर येथील नियोजित मेट्रो रेल्वे डबे निर्मितीसंदर्भात रेल्वे आणि राज्य शासनात सामंजस्य करार झाला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उद्योगमंत्री सुभाष देसाई, लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, मुख्य सचिव सुमित मलिक, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल, एमआयडीसीचे सीईओ संजय सेठी उपस्थित होते.
मराठवाडा हा अत्यल्प उद्योग असलेला प्रदेश आहे. यामुळे लातूरमध्ये हा कारखाना यावा, असा मुख्यमंत्र्यांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी अवघ्या पाच दिवसांत २ हजार एकर जागा या प्रकल्पासाठी रेल्वेच्या ताब्यात दिली. या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात ६०० कोटी रुपये गुंतवले जातील. त्यातून लाखो रोजगार निर्माण होतील, असे गोयल यांनी सांगितले. आज मुंबईसह पुणे, नागपूर आणि देशातील अन्य शहरांमध्ये मेट्रो रेल्वेचे जाळे उभारले जात आहे. देशाच्या एकूण मागणीच्या ५० टक्के डब्यांची मागणी महाराष्ट्रातच असेल. एवढेच नाहीतर, मेट्रोला जगभरात मागणी आहे. यामुळे लातूरचे हे डबे विदेशातही निर्यात केले जातील. बाहेरच्या देशात ‘लातूर मेट्रो’ हे नाव झळकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लातूरमध्ये येणाºया या कारखान्यामुळे मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जर्मन तंत्रज्ञानाचे डबे
लातूरच्या कारखान्यातील हे डबे जर्मन तंत्रज्ञानाचे असतील. लिंक हॉफमन बॉश (एलएचबी) या डबे तयार करणाºया जगातील अव्वल तंत्रज्ञानाचे हे डबे असतील. या डब्यांना जगभरात मागणी आहे.