मुंबईच्या ‘एसी लाईफलाईन’ ला लातूरचे बळ
By महेश चेमटे | Published: February 2, 2018 07:22 PM2018-02-02T19:22:13+5:302018-02-02T19:24:05+5:30
मुंबईकरांच्या लाईफलाईन मध्ये नुकतेच वातानुकूलित लोकलचा समावेश करण्यात आला. भविष्यात उपनगरीय लोकलसेवेत २१० वातानुकूलित लोकल दाखल करण्यात येणार आहे.
महेश चेमटे
मुंबई : मुंबईकरांच्या लाईफलाईन मध्ये नुकतेच वातानुकूलित लोकलचा समावेश करण्यात आला. भविष्यात उपनगरीय लोकलसेवेत २१० वातानुकूलित लोकल दाखल करण्यात येणार आहे. या वातानुकूलित लोकलची बांधणी मराठवाड्यातील लातूर येथील प्रस्तावित कोच फॅक्टरी येथे होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली.
अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ही माहिती दिली. गोयल म्हणाले की, महाराष्ट्रातील लातूर येथे उपनगरीय रेल्वे आणि मेट्रोच्या बोगींच्या निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. बोगींच्या कारखान्यात सर्वप्रथम वातानुकूलित बोगींची बांधणी होणार आहे. यानंतर मेट्रो बोगींची बांधणी होईल. या कारखान्यामुळे मराठवाड्याच्या आर्थिक प्रगतीला वेग मिळेल. कारखान्यांमुळे हजारो रोजगारांची निर्मिती देखील होणार असून त्याचा फायदा महाराष्ट्राला होणार आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी-३) आणि एमयुटीपी - ३ अ नूसार अनुक्रमे ४७ आणि २१० वातानुकूलित रेकचा समावेश आहे. अर्थसंक्लपाच्या पूर्वसंध्येला रेल्वे मंत्री पियूष गोयल मुंबई दौºयावर होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ अधिकाºयांच्या समवेत ‘विशेष बैठक’ आयोजित करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर येथे कोच फॅक्टरीची घोषणा केली होती.
मेक इन इंडिया या धर्तीवर हा प्रकल्प उभा राहणार आहे. राज्याने रेल्वे बोगींच्या कारखान्यासाठी विस्तृत जागेसह विविध करांमध्ये सवलती देण्याचे मान्य केले. त्याच बरोबर प्रकल्पासाठी आवश्यक त्या मंजूरी तातडीने देण्यात येतील. परिणामी हा प्रकल्प ‘फास्ट ट्रॅक’द्वारे त्वरित पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालयासह राज्य देखील ५१:४९ या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.