बँक खासगीकरण विरोधी जनअभियानाला सुरवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:07 AM2021-04-21T04:07:25+5:302021-04-21T04:07:25+5:30
मुंबई : बँकेच्या खासगीकरणाला विरोध करण्याकरिता महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त, राज्यातील सर्व जिल्ह्यांतून मंगळवारी अभियान ...
मुंबई : बँकेच्या खासगीकरणाला विरोध करण्याकरिता महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त, राज्यातील सर्व जिल्ह्यांतून मंगळवारी अभियान सुरू करण्यात आले.
महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले की, बँक खासगीकरण विरोधी अभियानाची सुरुवात मंगळवारी करण्यात आली. ज्या अंतर्गत संघटनेच्या सभासदांनी बँक ग्राहक तसेच लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून त्यांचा पाठिंबा मिळविला. धुळे येथील कार्यकर्ते आमदार फारूक शहा यांना, तर कोकण विभागातील कार्यकर्ते, रत्नागिरीचे आमदार व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, राजापूर-लांजा विधानसभेचे आमदार राजन साळवी, संगमेश्वर- चिपळूणचे आमदार शेखर निकाम यांना भेटले. या सर्वांनी संघटनेने घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत करत पूर्ण पाठिंबा जाहीर केला, असे त्यांनी सांगितले.
तसेच ते म्हणाले की, छोट्या-छोट्या गावातून सरपंच, पेन्शनर्स आणि ग्राहकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा जाहीर करून प्रधानमंत्र्यांना सादर करावयाच्या निवेदनावर सह्या केल्या. संघटनेतर्फे ही मोहीम एप्रिल आणि मे महिन्यात राबवली जाईल व महाराष्ट्रातून २५ लाख लोकांच्या सह्या या निवेदनावर घेतल्या जातील. या पूर्ण काळात संघटनेतर्फे नियमितपणे पोस्टर, पत्रके, ऑडिओ व्हिज्युअल्सच्या माध्यमातून लोकशिक्षण केले जाईल व त्यातून या प्रश्नावर जनजागृती केली जाईल.
आज महाराष्ट्र राज्यातील दहा हजार शाखेत काम करणाऱ्या संघटनेच्या तीस हजारांवर सभासदांनी बँक खासगीकरणाच्या विरोधात तीव्र संघर्ष करण्यात येईल, अशी शपथ घेतली.