लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मान्सूनच्या काळात कुठल्याही प्रकारच्या संभाव्य निकडीची पूर्तता करण्यासाठी जून ते सप्टेंबरपर्यंत सर्व प्रभागांमधील संचमांडणीच्या सुरक्षिततेची काळजी घेत अदानी इलेक्ट्रिसिटीने मध्यवर्ती आपत्ती नियंत्रण केंद्र सुरू केले आहे. महापालिकेसारख्या बाह्य प्राधिकरणांशी संपर्क व समन्वय साधून पथक कमीत कमी काळात वीज पुरवठा सुरळीत करण्याचा आणि पाणी साचण्याच्या घटनांच्या ठिकाणी त्वरित पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.
संभाव्य नैसर्गिक आपत्तीदरम्यान नुकसान आणि वीज वितरण व पुरवठ्यात कमीत कमी खंड पडेल, यासाठी विस्तृत आपत्ती व्यवस्थापन योजना कार्यान्वित आहे. वीजनिर्मिती, पारेषण जाळ्यांबाबत आपत्तीजनक प्रसंग उद्भवल्यास त्याचा सामना करण्याची तयारी करण्यात आली आहे. आपत्कालिन परिस्थितीत मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन कार्यसंघाला अतिरिक्त मदतीसाठी विशेष कार्यपथकही तयार आहे. समस्यांचे समाधान करण्यासाठी आठवड्याचे सातही दिवस अहोरात्र सुरू राहणारा टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांक, व्हॉट्सअॅप, एसएमएस किंवा मध्यवर्ती आपत्ती नियंत्रण केंद्राद्वारे आग किंवा विजेच्या धक्क्यांसंबंधी तातडीची मदत केली जाणार आहे. ग्राहक हे संकेतस्थळ / इलेक्ट्राच्या माध्यमातून तसेच फेसबुक, ट्विटरसारख्या समाजमाध्यमांद्वारे संपर्क साधू शकतात. ग्राहक त्यांचे पावसाळ्याशी संबंधित प्रश्न ॲपद्वारे विचारू शकतात.
*सुरक्षेच्या दृष्टीने काय करावे?
- मीटर केबीनच्या परिसरात पाणी साचणार नाही किंवा पाण्याच्या गळतीपासून ते पुरेसे संरक्षित आहे, याची खातरजमा करा.
- वायरिंगमध्ये काही बदल केले गेले असल्यास परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडून त्याची संपूर्ण तपासणी व चाचणी आवश्यक.
- ओलसर हातांनी किंवा हँडग्लोव्हज्, सेफ्टी शूज अथवा इन्सुलेटेड प्लॅटफॉर्मचा वापर केल्याविना विद्युत जोडणी असलेल्या ठिकाणांना स्पर्श करू नये.
- मंजूर भारापेक्षा जास्त विजेचा वापर टाळावा.
- मीटर केबीन, पथदिव्यांचे खांब किंवा वितरण खांबांमध्ये ठिणगी उडत असल्यास त्याला स्पर्श करू नये.
........................................................