Join us

देशांतर्गत विमान सेवा सुरु झाल्याने एव्हिएशन क्षेत्राला आधार, परिस्थिती हळुहळु पूर्वपदावर येईल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 6:18 PM

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक अद्यापही ठप्प असली तरी देशांतर्गत हवाई वाहतूक काही प्रमाणात सुरु झाल्याने या क्षेत्राला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

 

खलील गिरकर

मुंबई : कोरोनामुळे देशभरात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे भारतातील देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक अद्यापही ठप्प असली तरी देशांतर्गत हवाई वाहतूक काही प्रमाणात सुरु झाल्याने या क्षेत्राला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या काही अटींवर देशांतर्गत हवाई प्रवास सुरु झाल्याने या ठप्प झालेल्या क्षेत्राला काहीशी उभारी मिळू शकते असे मत या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. 

एव्हिएशन क्षेत्रातील जाणकार विपुल सक्सेना यांनी देशांतर्गत हवाई प्रवास सुरु करण्याच्या केंद्र सरकार च्या निर्णयाचे स्वागत केले. हे अत्यंत चांगले पाऊल आहे. लॉकडाऊन समाप्त झाल्यावर हे पाऊल उचलावेच लागणार होते. सरकारने हे अत्यंत धाडसी पाऊल उचलले आहे. मात्र हा अत्यंत चांगला व एव्हिएशन क्षेत्रासाठी उभारी देणारा निर्णय आहे. सध्या केवळ अत्यावश्यक कारणांसाठी प्रवास करु इच्छिणाऱ्यांसाठी हा प्रवास सुरु असला तरी सध्या प्रवाशांचा जास्त भार नसल्याने कोरोनासोबत प्रवास करताना काय काळजी घ्यावी व कसा प्रवास करावा याचे प्रशिक्षण या काळात हवाई वाहतूक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळेल. कर्मचाऱ्यांच्या आत्मविश्वासात देखील वाढ होईल. सध्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे मात्र हे भीतीचे वातावरण हळूहळू कमी होत जाईल व विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाईल असा विश्वास सक्सेना यांनी व्यक्त केला. 

विमान प्रवास करताना विमानतळावर प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग केली जाते त्यामध्ये काही प्रवासी लबाडी करत असल्याचे समोर आले आहे. विमानतळावर प्रवेश करण्यापूर्वी ताप असल्यास तापाची गोळी खाणे,  वातानुकुलित यंत्रासमोर उभे राहून शरीराचे, डोक्याचे तापमान कमी करणे, थंड कापडाने डोके पुसणे असे प्रकार करुन प्रवासी इतर प्रवासी व विमान वाहतूक कंपन्यासोबत धोका करत आहेत. त्याचा फटका इतर प्रवासी व विमान कंपन्यांना बसत आहे त्यामुळे असे गैरप्रकार करणाऱ्या प्रवाशांविरोधात प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी सक्सेना यांंनी केली आहे. अशा प्रवाशांना कसे पकडायचे याची माहिती विमान कंपन्यांना कालांतराने मिळेल व असे प्रकार थांबतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या महिन्याभरात प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होईल व लवकरच हेे क्षेत्र पूर्वपदावर येईल असा दावा सक्सेना यांनी केला. 

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याविमानतळमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या