दिव्यांगांना मोफत बेस्ट प्रवास योजनेचा आरंभ

By Admin | Published: October 21, 2016 04:04 AM2016-10-21T04:04:19+5:302016-10-21T04:04:19+5:30

दिव्यांग व्यक्तींना बेस्ट बसमधून मोफत प्रवास सवलत उपलब्ध करून देत महापालिकेने सामाजिक दायित्व जपले आहे. प्रवास सवलतीकरिता देण्यात आलेले ओळखपत्र

The launch of Free Best Travel Plan for Divyang | दिव्यांगांना मोफत बेस्ट प्रवास योजनेचा आरंभ

दिव्यांगांना मोफत बेस्ट प्रवास योजनेचा आरंभ

googlenewsNext

मुंबई : दिव्यांग व्यक्तींना बेस्ट बसमधून मोफत प्रवास सवलत उपलब्ध करून देत महापालिकेने सामाजिक दायित्व जपले आहे. प्रवास सवलतीकरिता देण्यात आलेले ओळखपत्र ‘स्मार्ट’ असून, यापुढेही दिव्यांग व्यक्तींना आवश्यक व अद्ययावत सेवा-सुविधा पुरविण्याकरिता महापालिका प्रयत्नशील असेल, असे प्रतिपादन महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.
महापालिकेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना बेस्टच्या विनावातानुकूलित बसमधून मोफत प्रवासाची सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ ओळखपत्र वितरणाच्या स्वरूपात स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते महापौर निवास येथे करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या.
प्रवास सवलतीच्या स्मार्ट कार्डव्यतिरिक्त इतर कोणत्याही वैयक्तिक ओळखपत्रावर ही सवलत देण्यात येणार नाही. वातानुकूलित बस वगळून इतर बेस्ट बसेसमध्ये या योजनेचा लाभ घेता येईल. ज्या दिव्यांग व्यक्तींना बसपास वितरण केंद्रावर नोंदणी व छायाचित्र काढण्याकरिता येणे शक्य नसेल, त्यांना पर्यायी व्यक्तीमार्फत नोंदणीची सुविधा देण्यात येईल. नोंदणी केल्यापासून कामकाजाच्या ४ ते ७ दिवसांत स्मार्ट कार्ड पुरविण्यात येणार असून, प्रवास करताना स्मार्ट कार्ड सोबत बाळगणे आवश्यक असेल. तसेच हे कार्ड अहस्तांतरणीय स्वरूपाचे आहे. हे कार्ड हरविल्यास/खराब झाल्यास नवीन स्मार्ट कार्ड वितरित करण्यात येईल.
एकूण ३७ दिव्यांग व्यक्तींना मोफत प्रवास सवलतीचे स्मार्ट ओळखपत्र वितरित करण्यात आले. शिवसेना अपंग साहाय्य सेना, प्रहार संघटना, बृहन्महाराष्ट्र अपंग संचलित टेलिफोन बूथ संघटना तसेच महाराष्ट्र अपंग संघटना या संस्थांच्या सदस्यांचाही यात समावेश होता.

दिव्यांग व्यक्तींना बेस्ट बसमधून मोफत प्रवास सवलतीकरिता गटनेत्यांच्या सभेमध्ये विषय मंजूर करण्यात आला आहे. एक कोटी रुपयांची तरतूद महापालिकेने केली. ही योजना अद्ययावत व संगणकीकृत असून, प्रवास सवलतीचे ओळखपत्रदेखील स्मार्ट स्वरूपाचे आहे. सर्व सूचना आणि विचार लक्षात घेऊन ही परिपूर्ण योजना तयार केली आहे. बेस्टच्या २७ आगारांतून ही सुविधा उपलब्ध असून, २४ आॅक्टोबरपासून ही ओळखपत्रे कार्यान्वित होणार आहेत.
- स्नेहल आंबेकर, महापौर

वातानुकूलित बस वगळता इतर सर्व बेस्ट बसमध्ये ही मोफत प्रवास सवलत ४० टक्के व अधिक दिव्यांग व्यक्तींना उपलब्ध आहे. त्याकरिता इच्छुक दिव्यांग व्यक्तींनी जवळच्या/सोईस्कर कोणत्याही आगारात जाऊन प्रशासनाकडे माहिती व कागदपत्रे सादर करावीत. बसमध्ये प्रवास करताना स्मार्ट कार्ड बस वाहकाकडील संयंत्रावर नोंदविले जाणार असून, दिव्यांग व्यक्तींना तिकीट दिले जाईल. मात्र, त्याचे शुल्क अदा करावे लागणार नाही.
- रविकांत देशपांडे, उपमहाव्यवस्थापक, बेस्ट

महापालिकेने दिव्यांग व्यक्तींसाठी एकूण अर्थसंकल्पाच्या तीन टक्के निधी राखीव ठेवला आहे. ही रक्कम मोठी असून, त्याचा पूर्ण विनियोग होईल, अशी अपेक्षा आहे.
-संदीप देशपांडे,गटनेते, मनसे

Web Title: The launch of Free Best Travel Plan for Divyang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.