नामदेव मोरे, नवी मुंबई अमली पदार्थमुक्त नवी मुंबई करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबविण्यास सुरवात केली आहे. गांजा व इतर वस्तू विकणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. शहरात सर्वत्र धाडसत्र सुरू असून दोन आरोपींना अटक केली आहे. यापूर्वी या गुन्ह्यांमध्ये सहभाग असणाऱ्यांचीही झाडाझडती सुरू झाली आहे. नवी मुंबईमध्ये खुलेआम गांजा विक्री होत असल्याचे ‘लोकमत’च्या टीमने स्टिंग आॅपरेशन करून उघडकीस आणले होते. १५ दिवसांमध्ये दोन वेळा शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेली गांजा विक्री व अड्ड्यांचे छायाचित्र प्रसिद्ध केल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. २९ जुलैला पहिले वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर नेरूळ, एपीएमसी पोलिसांसह अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून तीन गुन्हे दाखल केले होते. यानंतर अनेक विक्रेत्यांनी त्यांचे अड्डे बंद केले. परंतु ज्यांच्यावर कारवाई झाली नाही अशांनी त्यांचा व्यवसाय सुरूच ठेवला. सानपाड्यामध्ये अशोक पांडे, एपीएमसीमध्ये हरिदास विधाते, धान्य मार्केटसमोर कराळे, सुनील व गोऱ्या यांचे कांदा मार्केटजवळ अड्डे सुरूच होते. ‘लोकमत’ने १० आॅगस्टला सर्व ठिकाणी स्टिंग आॅपरेशन करून गांजा विक्री सुरूच असल्याचे उघडकीस आणल्यानंतर पोलिसांनी अमली पदार्थ विक्री होवूच नये यासाठी विशेष मोहीम राबविण्यास सुरवात केली आहे. शहरात कुठे अमली पदार्थांची विक्री होते काय याची माहिती घेतली जात आहे. ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिलेल्या अड्ड्यांवरही धाडी टाकल्या आहेत. याशिवाय यापूर्वी अमली पदार्थांच्या विक्रीप्रकरणी कारवाई केलेल्या आरोपींच्या हालचालीवरही लक्ष ठेवले जात आहे. अनेकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांची चौकशी केली आहे. यापुढे कोठेही अवैध व्यवसाय होवू दिला जाणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. एपीएमसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये साध्या गणवेशातील पोलिसांची गस्त सुरू केली आहे. या परिसरामध्ये बाहेरून व शहरातील इतर विभागातून काही जण गांजा विकण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगाने सापळा रचून बुधवारी पुनित सुरेंद्रप्रसाद मिश्रा या आरोपीला अटक केली आहे. हा भाजी मार्केटच्या प्रसाधनगृहाजवळ गांजा सेवन करत असताना मिळून आला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला कोण गांजा पुरवितो याचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी याच परिसरामध्ये धाड टाकून विकास ऊर्फ राकेश विजय यादव या गांजा विक्रेत्याला अटक केली आहे. त्याच्याकडून १७८ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. यापुढे नियमित गस्त घालून गांजा विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. एपीएमसी प्रशासनालाही सुरक्षा रक्षकांना दक्ष राहण्याच्या सूचना द्याव्या असे सुचविले आहे. पोलिसांनी अमली पदार्थ विक्री करण्याच्या गुन्ह्यात यापूर्वी अटक झालेल्यांचीही चौकशी सुरू केली आहे. यापूर्वी एमडी पावडर विक्रीचा गुन्हा असणाऱ्या गोऱ्याचीही चौकशी केली. गोऱ्याने दोन वर्षांपासून अशाप्रकारचे कोणतेही काम करत नसून रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. पोलिसांनी सानपाड्याच्या अशोकसह भाजी मार्केटमधील विधाते पिता-पुत्रांच्या हालचालींवरही लक्ष ठेवण्यास सुरवात केली आहे. पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे गांजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
गांजा विक्रेत्यांची धरपकड सुरू
By admin | Published: August 12, 2016 2:37 AM