मुंबई - पंतप्रधान जनआरोग्य योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजनेचे महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल के. विद्यासागर राव यांच्याहस्ते आज उद्घाटन झाले. राज्यातील 83 लाख 72 हजार नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे.
देशातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवेचा लाभ घेता यावा, यासाठी आयुष्यमान भारत ही महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील 83 लाख 72 हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आज महाराष्ट्राचे राज्यपाल के. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या योजनेचा शुभारंभ केला. यावेळी निवडक लाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटपही करण्यात आले. सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील 2011 च्या आकडेवाडीनुसार राज्यातील 83 लाख 72 हजार कुटुंबाची निवड या योजनेसाठी करण्यात आली आहे.
यांना मिळेल योजनेचा लाभ
आयुष्यमान भारत योजनेत पात्र लाभार्थी ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमातीचे, दारिद्रयरेषेखालील कुटुंब, भूमिहीन, दिव्यांग सदस्य असलेले कुटुंब, अतिकष्टाचे काम करणारे कुटुंब, एका खोलीत कच्च्या घरात राहणारे, महिला कुटुंबप्रमुख असलेले यांचा या योजनेत सहभाग आहे. शहरी भागातील कचरा वेचणारे कुटुंब, भिकारी, घरकाम करणारे, रस्त्यावर विक्री करणारे, बांधकाम, रंगकाम, प्लम्बर, गवंडी, वेल्डर, गटई कामगार, फेरीवाले, सफाई कामगार, हस्तकला कारागीर, शिंपी, वाहतूक कर्मचारी, चालक, वाहक व सायकलरिक्षा ओढणारे, दुकानात काम करणारे शिपाई, अटेंडंट, हॉटेल वेटर, मेकॅनिक / वीजतंत्री, असेम्ब्ली, दुरूस्ती करणारे, धोबी आणि चौकीदार आदींच्या कुटुंबांना या योजनेत पात्र ठरवण्यात आले आहे.