मुंबई-गोवा लक्झरी क्रुझ सेवा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 06:38 AM2018-10-21T06:38:18+5:302018-10-21T06:38:25+5:30
देशातील मुंबई-गोवा या पहिल्या देशांतर्गत लक्झरी क्रुझ सेवेचा शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ झाला.
मुंबई- देशातील मुंबई-गोवा या पहिल्या देशांतर्गत लक्झरी क्रुझ सेवेचा शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. ‘आंग्रीया’ असे या लक्झरी जहाजाचे नाव आहे. मुंबईतील देशांतर्गत क्रुझ टर्मिनलचेही या वेळी उद्घाटन झाले. यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार आहे.
देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले, सुमारे दोनशे वर्षांनंतर मुंबईचा पूर्व समुद्रकिनारा लोकांसाठी खुला होत आहे. मुंबईत लवकरच मरीना क्लब तसेच जलवाहतूकही सुरू होणार आहे. क्रुझ पर्यटनाच्या प्रकल्पांमधून सुमारे तीस हजार कोटींची उलाढाल होईल. मुंबईचा जीडीपी वाढेल. त्यातून महाराष्ट्र आणि देशाच्या जीडीपी विकासामध्येही भर पडेल.
नितीन गडकरी म्हणाले, देशात आंतरराष्ट्रीय क्रुझमधून येत्या पाच वर्षांत सुमारे चाळीस लाख परदेशी पर्यटक येतील. त्यापैकी ३२ लाख पर्यटक हे मुंबईत येतील. यातून ३० हजार कोटी रुपये इतके परकीय चलन आपल्याला मिळेल. यातून सुमारे अडीच लाख नव्या रोजगारांची निर्मिती होईल.जलवाहतूक सेवा मुंबईकरांना वरदान ठरेल.
भविष्यात १३१ मीटर लांबीच्या या ‘अंग्रिया’ जहाजाचे नाव मराठा सरदार कान्होजी आंग्रे यांच्या नावावरून ठेवले आहे. शिपमध्ये १०४ खोल्या आहेत. एका वेळी ३५० प्रवासी प्रवास करू शकतात. दरम्यान, ही क्रुझ खोल समुद्रात जाणार नाही. किनारी भागातून प्रवास करेल. परिणामी, प्रवाशांना समुद्र किनाऱ्याचे सौंदर्य न्याहाळता येईल.