मुंबई: तरूणांना परदेशातील रोजगारासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कौशल्य विकास प्रबोधिनीची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने विद्या विहार येथे प्रथमच सुरु झालेल्या स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा देखील उपस्थित होते.
जपान, जर्मनी, इस्राईल आणि फ्रांस या चार देशांमध्ये विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम या प्रबोधिनीच्या माध्यमातून होणार आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच जर्मनी सोबत महाराष्ट्र सरकारचा करार झाला असून, ज्याद्वारे ५ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पण इच्छुक उमेदवारांना जर्मन भाषा येणे अनिवार्य आहे. अशा मागण्या लक्षात घेऊन, बाहेर देशातील उपलब्ध रोजगार आणि त्यासाठी आवश्यक भाषा कौशल्य युवकांना मिळावे यासाठी या प्रबोधिनीमध्ये जपानी, हिब्रू, जर्मन आणि फ्रेंच या ४ भाषांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
परदेशात जाण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा इच्छुकांना मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र इंटरनॅशनल सेंटरची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. बदलत्या डिजिटल युगाच्या गरजांसाठी, स्वयं-रोजगारासाठी या प्रबोधिनीच्या माध्यमातून AI सारख्या नाविन्यपूर्ण विषयाच्या प्रशिक्षणाची व्यवस्था तसेच स्टार्टप्ससाठी इनक्यूबेशन सेंटरची व्यवस्था करण्यात येणार आहे.