Join us

एसएनडीटी विद्यापीठात ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ अभियानाची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 1:56 AM

या ७ दिवसांच्या अभ्यास दौऱ्यात रमादेवी महिला विद्यापीठातील १० विद्यार्थिनी व २ शिक्षक एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठातील विविध विभागांना भेटी देणार असून, त्या विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत़,

मुंबई : राज्यभरातील सर्व महाविद्यालयांत केंद्र सरकारचा एक भारत, श्रेष्ठ भारत अभियान राबविले जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून या अभियानास चर्चगेट येथील एसएनडीटी महिला विद्यापीठात प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत ओडिशामधील रमादेवी महिला विद्यापीठातील १० विद्यार्थिनी व २ शिक्षक डॉ. पटनाईक, डॉ. त्रिपाठी सहभागी झाले आहेत.

शेजारील राज्यांतील कला, संस्कृती आणि परंपरेची देवाणघेवाण म्हणून केंद्र सरकारने हा अभिनव उपक्रम सर्व राज्यांमधील महाविद्यालयांत सुरू केला होता. आता हा उपक्रम महाविद्यालयांमध्ये सक्तीचा करण्यात आला आहे़ याबाबतचा अहवाल यूजीसीला प्रत्येक आठवड्याला पाठवावा लागणार आहे.

प्रत्येक राज्यामधील कला, संस्कृती आणि परंपरा जाणून घेत, एकोपा वाढविण्यासाठी केंद्र सरकारने एक भारत, श्रेष्ठ भारत अभियान हाती घेतले. प्रास्ताविक एसएनडीटी महिला विद्यापीठातर्फे या अभियानाच्या नोडल अधिकारी प्रा.डॉ.आशा पाटील यांनी केले़ त्यानंतर, त्यांनी व प्रा.डॉ.अर्चना भटनागर यांनी ओदिशा राज्यातील रमादेवी महिला विद्यापीठातील २ शिक्षकांचे स्वागत केले. त्याचबरोबर, विद्यापीठातील विद्यार्थिनींनी रमादेवी महिला विद्यापीठातील १० विद्यार्थिनींचे स्वागत पारंपरिक पद्धतीने केले. कार्यक्रमात महाराष्ट्र व ओदिशा राज्यातील लोकनृत्याचे सादरीकरण करण्यात आले़ ओदिशा राज्यातील विद्यार्थिनींनी त्यांची ओळख मराठी भाषेतून करून देण्याचा, तसेच एसएनडीटी महिला विद्यापीठातील विद्यार्थिनींनी उडिया भाषेतून ओळख करून देण्याचा प्रयत्न केला.

या ७ दिवसांच्या अभ्यास दौऱ्यात रमादेवी महिला विद्यापीठातील १० विद्यार्थिनी व २ शिक्षक एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठातील विविध विभागांना भेटी देणार असून, त्या विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत़, तसेच मुंबई व आसपास असलेल्या पर्यटनस्थळांना भेटी देऊन महाराष्ट्राची संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. या अभियानामुळे दोन्ही राज्यांतील विद्यार्थिनींमध्ये संवाद वाढीस लागून, विविधतेत एकता ही संकल्पना दृढ होण्यास हे अभियान नक्कीच मदत करेल, असा विश्वास प्रा.डॉ.आशा पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, एसएनडीटी विद्यापीठाने महाराष्ट्र व ओडिशा राज्यातील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, तसेच समाजमाध्यमांचा वापर करून त्या राज्याची संस्कृती, भाषा, चालीरीती, लोककला, तसेच ऐतिहासिक वास्तू यांचे अध्ययन करणार आहेत. या ७ दिवसांच्या अभ्यास दौºयात रमादेवी महिला विद्यापीठातील १० विद्यार्थिनी व २ शिक्षक एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठातील विविध विभागांना भेटी देणार असून, त्या विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत़,