Join us

दोन उड्डाणपूल सुरू झाल्यावर बीकेसीतील वाहतूककोंडी फुटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 3:14 AM

एमएमआरडीएची माहिती; सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन; १६३ कोटींचा खर्च

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या ठिकाणी उड्डाणपुलांच्या उभारणीचे काम हाती घेतले असून आगामी काळात हे पूल वाहतुकीसाठी खुले होतील. त्यानंतर येथील वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार असल्याचे एमएमआरडीएचे म्हणणे आहे.वांद्रे-कुर्ला संकुल ते सी-लिंककडे जाणारा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. तसेच सी-लिंककडून बीकेसीमध्ये येणारा उड्डाणपूल आणि धारावीकडून सी-लिंककडे जाणारी वाहतूक सतत सुरू ठेवण्यासाठी शासकीय जमिनीवरून ३०० मीटर लांबीचा आणि १२ फूट रुंदीचा रस्ता बांधण्यात येणार आहे. बीकेसी ते चुनाभट्टी दरम्यानचा उड्डाणपूल गेल्याच आठवड्यात वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. बीकेसीमध्ये उभारण्यात येणारे दोन उड्डाणपूल आणि एका उन्नत मार्गामुळे बीकेसीतील वाहतूककोंडी सुटणार आहे. या एकूण प्रकल्पासाठी अंदाजित १६३ कोटी इतका खर्च आहे. टप्पा-१ मध्ये बीकेसी ते सी-लिंकच्या दिशेने जाणारा आणि येणारा अशा दोन उड्डाणपुलांचे आणि शासकीय जमिनीतून जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम सुरू असून येत्या पाच ते सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.स्मार्ट बीकेसी प्रकल्पाची उभारणीबीकेसीमध्ये सरकारी कार्यालये, बँकांची मुख्यालये, व्यावसायिक कंपन्या आदी महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. दिवसाला हजारो वाहनचालकांचा या विभागात वावर असतो. बीकेसीत येणाऱ्यांचा वेळ कसा वाचेल, त्यांना सुरक्षा कशी पुरवता येईल, सोबत पर्यावरणाचा समतोल कसा साधता येईल, या सर्व मुद्द्यांचा विचार करून स्मार्ट बीकेसी प्रकल्प उभारण्यात येत आहे. यासह बीकेसीतील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएने तीन उड्डाणपूल, एका मार्गाचे बांधकाम सुरू केले आहे.

टॅग्स :वाहतूक कोंडी