लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पालिकेच्या के पश्चिम वॉर्डने वर्सोवा, यारी रोड परिसरातील कचरा कमी करण्यासाठी शून्य कचरा मोहीम राबविण्याचा संकल्प केला आहे.
या प्रकल्पांतर्गत विभागातील सुखा कचरा गोळा करून त्यावर विविध प्रकारच्या वापरासाठी (सुशोभीकरण, बांधकाम साहित्य, बायोगॅस, खत वगैरेसारख्या गोष्टींसाठी) प्रक्रिया करून तो वापरण्यात यावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेला प्रकल्प संपूर्ण मुंबईमध्ये आदर्शवत व्हावा आणि हा प्रयोग बघण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून लोक यावेत; आणि असा यशस्वी प्रयोग संपूर्ण मुंबईत राबविण्यात यावा, अशी आशा या वेळी के पश्चिम विभागाचे साहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी व्यक्त केली.
शिवसेना प्रभाग क्र. ५९च्या नगरसेविका प्रतिमा खोपडे यांच्या प्रयत्नाने वर्सोवा, यारी रोड येथे महापालिकेच्या वतीने व युथ स्वराज्य संस्थेच्या सहकार्याने शून्य कचरा मोहिमेची संकल्पना यशस्वी करण्यासाठी ‘सुका कचरा व प्लास्टीक विलगीकरण’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ विश्वास मोटे व माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर(शैलेश) फणसे यांच्या हस्ते काल संपन्न झाला. या प्रयोगासाठी परिश्रम घेणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांचा या वेळी मोटे यांनी सत्कार केला.
-------------------------