मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत सध्यातरी कुठलाही विचार राज्य सरकारचा नसल्याचे दिसून येत आहे. कारण, विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षण वर्गासाठी शिक्षण विभागाकडून काही मागर्दर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचा अध्यादेशच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला होता. त्यानंतर, आता जिओ टीव्हीवर इयत्ता 3 री ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 12 चॅनेल्स सुरू केल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने दीड महिन्यांपूर्वीच रिलायन्स जिओसोबत ऑनलाईन शिक्षणासाठी करार केला आहे. त्यानुसार, रिलायन्स जिओ टीव्हीवर 12 चॅनेल्स सुरू करण्यात आले आहेत. इयत्ता 1 ली ते 10 वी मराठी व उर्दू माध्यमांतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे ४ युट्युब चॅनेल, आहेत. लवकरच हिंदी व इंग्रजी माध्यमांसाठीही हे चॅनेल्स सुरू करणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. 4 माध्यमांमध्ये चॅनेल्स सुरू करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले