देशातील पहिले फिरते पोटविकार केंद्र सुरू; राज्यातील गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 04:42 AM2019-12-11T04:42:38+5:302019-12-11T04:42:59+5:30
सुविधा सुरू करण्यासाठी नरेंद्र कुमार बलदोटा व परिवार यांनी देणगी देऊन पुढाकार घेतला आहे.
मुंबई : समाजऋणाची जाणीव ठेवून ग्लोबल रुग्णालयाचे संचालक डॉ. अमित मायदेव यांनी ‘एन्डोस्कोपी आॅन व्हील्स’ म्हणजेच फिरत्या पोटविकार केंद्राची निर्मिती केली आहे. या फिरत्या केंद्रात अद्ययावत सोयी-सुविधांनी सज्ज आॅपरेशन थिएटर आहे. या गाडीत उपस्थित असणारे दोन तज्ज्ञ डॉक्टर आणि तंत्रज्ञ रुग्णांना वैद्यकीय सुविधा देतील.
एच-पायलोरी, कर्करोगाचे लवकर निदान, आतड्यांचा अल्सर, बायोप्सी, आतड्यांना सूज आली असेल तर त्याचे निदान, अॅसिडिटीची तपासणी या केंद्राच्या माध्यमातून करण्यात येईल.ही सुविधा सुरू करण्यासाठी नरेंद्र कुमार बलदोटा व परिवार यांनी देणगी देऊन पुढाकार घेतला आहे.या केंद्रातील संपूर्ण सुविधा विनामूल्य असतील. त्यामुळे पोटविकार होण्याची कारणे व त्यावरील उपाय आणि उपचार याबाबत लोकांमध्ये या केंद्राच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
एखाद्या प्रकरणात तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला हवा असल्यास डॉ. मायदेव स्वत: गाडीवर उपलब्ध असणाºया डॉक्टरांना मार्गदर्शन करतील. या गाडीचे प्रभारी म्हणून ग्लोबल रुग्णालयाचे संचालक डॉ. अमित मायदेव सर्व कामकाज पाहणार आहेत. विधानमंडळाच्या प्रांगणात मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.
रुग्णांचे निदान तत्काळ व्हावे आणि उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सोयी-सुविधा त्यांना मोफत मिळाव्यात या दृष्टीने एन्डोस्कोपी आॅन व्हील्सची सुरुवात करण्यात आली असून वर्षभर ही व्हॅन राज्यभर फिरणार असल्याचे डॉ. मायदेव यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन आणि बलदोटा इन्स्टिट्यूट आॅफ डायजेस्टिव्ह सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र सुरू करण्यात आले.
गरीब, गरजूंना दर्जेदार अद्ययावत उपचार मिळणार - मुख्यमंत्री
पद्मश्री डॉ. अमित मायदेव यांच्या संकल्पनेतील देशातील पहिली फिरती वैद्यकीय व्हॅन गरीब आणि गरजू रुग्णांना पोट विकारावर अद्ययावत दर्जाचे उपचार देईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. हे भारतातील पहिले फिरते पोटविकार केंद्र असून त्याची सुरुवात महाराष्ट्रातून होत आहे, ही बाब अभिमानास्पद आहे, असेही ते म्हणाले.