मुंबई : आपल्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी नौदलाला आवश्यक असलेले पाठबळ पुरवण्याचे काम माझगाव गोदींच्या माध्यमातून होत आहे, पाणबुडीसारख्या अतिशय गुंतागुंतीच्या आणि उच्च तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या नौकांची निर्मिती करण्याची क्षमता देशात विकसित केल्याचा आपल्याला अभिमान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
कलवरी वर्गातील ‘वागीर’ या पाचव्या पाणबुडीचे गुरूवारी संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत मुंबईतील माझगाव गोदीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जलावतरण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी माझगाव गोदीचे तोंडभरुन कौतुक केले. या प्रसंगी वाईस ऍडमिरल एस आर शर्मा, वेस्टर्न नेव्हल कमांडचे प्रमुख वाईस ऍडमिरल आर बी पंडित, माझगाव गोदीचे व्यवस्थापकीय संचालक निवृत्त वाईस ऍडमिरल नारायण प्रसाद उपस्थित होते.
समुद्राखाली आणि बाहेरही टाॅरपेडो डागण्याची क्षमता तसेच युद्धनौका विरोधी क्षेपणास्त्रांच्या अचूक मारक क्षमतेमुळे या श्रेणीतील पाणबुड्या शत्रुसाठी घातक मानल्या जातात. उर्वरित दोन पाणबुड्यांच्या सागरी चाचण्या सुरू आहेत. ‘वागीर’ नावाचा मासा खोल समुद्रात पाण्याच्या तळाशी वाळूत सापडणाऱ्या माशाच्या नावावरून या पाणबुडीला वागीर हे नाव देण्यात आले आहे.