डेक्कन क्वीन, पंचवटी एक्स्प्रेसमध्ये फिरत्या ग्रंथालयाचा शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 12:48 AM2018-10-16T00:48:04+5:302018-10-16T00:48:33+5:30

वाचकांसाठी पर्वणी : राज्य मराठी विकास संस्था, भारतीय रेल्वेचा संयुक्त उपक्रम; मासिक पासधारकांना मिळणार नि:शुल्क सेवा

Launching the Walking Library in Deccan Queen, Panchavati Express | डेक्कन क्वीन, पंचवटी एक्स्प्रेसमध्ये फिरत्या ग्रंथालयाचा शुभारंभ

डेक्कन क्वीन, पंचवटी एक्स्प्रेसमध्ये फिरत्या ग्रंथालयाचा शुभारंभ

Next

मुंबई : वाचन प्रेरणा दिवसाचे औचित्य साधत डेक्कन क्वीन आणि पंचवटी एक्स्प्रेस या दोन रेल्वेगाड्यांमध्ये सोमवारी मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत फिरत्या ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. राज्य मराठी विकास संस्था आणि भारतीय रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्र म राबविण्यात आला आहे. या गाड्यांमधील मासिक पासधारकांना पुस्तकांची ही आगळीवेगळी सेवा वर्षभर नि:शुल्कपणे उपलब्ध होणार आहे.


माजी राष्ट्रपती भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी, १५ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त सोमवारी प्रथम मुंबई-पुणे मार्गावरील डेक्कन एक्स्प्रेस आणि नंतर मुंबई-नाशिक मार्गावरील पंचवटी एक्स्प्रेसमध्ये फिरत्या ग्रंथालयाची सुरुवात करण्यात आली. मराठी भाषा विभागाचे वाचनदूत या दोन गाड्यांमध्ये खास पुस्तकांसाठी तयार करण्यात आलेल्या ट्रॉलीमधून प्रवाशांना वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून देतील. प्रवास संपताना ही पुस्तके पुन्हा ट्रॉलीमध्ये जमा केली जातील. दर दोन-तीन महिन्यांनंतर या ग्रंथालयातील पुस्तके बदलली जाणार असल्याचेही तावडे यांनी या वेळी स्पष्ट केले.




वाहतूक पोलिसांना पुस्तक भेट
वाचन प्रेरणा दिवसाचे औचित्य साधून मंत्री तावडे यांनी गिरगाव चौपाटी आणि चर्चगेट येथे कार्यरत असणाऱ्या वाहतूक पोलीस आणि मुंबई पोलिसांना पुस्तकांचे वाटप केले. या वेळी स्थानिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर मंत्रालयात माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगण येथे आयोजित करण्यात आलेल्या वाचन कट्ट्याला मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी भेट दिली. त्यांनी स्वत: वाचन कट्ट्यावर बसून काही वेळ पुस्तकांचे वाचन केले.


शिक्षणमंत्र्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
वाचन प्रेरणा दिनानिमित्त मंत्री तावडे यांनी एस. एल. अ‍ॅण्ड एस. एस. गर्ल्स हायस्कूलला भेट देत उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी आर्यन हायस्कूल, शारदा सदन, सॅबेस्टाइन हायस्कूल, बीजेपीसी स्कूलचे विद्यार्थीही उपस्थित होते. गोष्टीचे पुस्तक, कथा, कादंबरीचे वाचन विद्यार्थ्यांनी करावे. प्रत्येक विद्यार्थ्याने येत्या वर्षभरात किमान दहा पुस्तके वाचण्याची प्रतिज्ञा करावी, असे आवाहन तावडे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकेही भेट दिली.

कर्णबधिर विद्यार्थ्यांचे काव्यवाचन
केवळ वाचन नव्हे; तर वाचनाची प्रेरणा देणारा ‘वाचन प्रेरणा दिन’ माहीम सार्वजनिक वाचनालयात उत्साहात साजरा करण्यात आला. सलग सात तास आणि तीन टप्प्यांत रंगलेल्या ‘वाचनध्यास’ या कार्यक्रमात मुलांसह ज्येष्ठ वाचकांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माहीम सार्वजनिक वाचनालयात डॉ. कलाम यांची प्रतिमा, तसेच त्यांच्या ग्रंथसंपदेची मांडणी करण्यात आली होती. या वेळी शिवाजी पार्क लायन्स क्लबच्या कर्णबधिर विद्यार्थ्यांनी काव्यवाचन करून उपस्थितांची मने जिंकली. बालकलाकार अथर्व बेडेकर याच्यासह कुणाल पवार, गणेश करंबेळकर, हर्षल हजारी आदी युवा वाचकांनी यात सहभाग घेतला. ज्येष्ठ लेखक कुमार नवाथे व ज्येष्ठ वैज्ञानिक व लेखक डॉ. प्रबोध चोबे यांनी या वेळी त्यांच्या जीवनातील पुस्तकांचे स्थान या विषयावर श्रोत्यांशी सुसंवाद साधला.

Web Title: Launching the Walking Library in Deccan Queen, Panchavati Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.