पार्किंगला जागा मिळत नसल्याने लावली आग
By admin | Published: March 29, 2016 02:20 AM2016-03-29T02:20:14+5:302016-03-29T02:20:14+5:30
पार्किंगला जागा मिळत नसल्याने सोसायटीतील रहिवासी तरुणांनीच दुचाकींना आग लावल्याची धक्कादायक माहिती करी रोड जळीतकांडातून उघड झाली आहे. याप्रकरणी महेंद्र घाडी
मुंबई : पार्किंगला जागा मिळत नसल्याने सोसायटीतील रहिवासी तरुणांनीच दुचाकींना आग लावल्याची धक्कादायक माहिती करी रोड जळीतकांडातून उघड झाली आहे. याप्रकरणी महेंद्र घाडी आणि मयूर घाडीगावकर यांना अटक करण्यात आली आहे.
करी रोड येथील महादेव पालव मार्गावरील विघ्नहर्ता या सोसायटीमध्ये ही घटना घडली. या इमारतीत तब्बल ५४० कुटुंबे गेल्या तीन वर्षांपासून राहण्यास आहेत. त्यामुळे या परिसरात २०० ते २५० वाहने पार्क केली जातात. २० मार्च रोजी येथे पार्क केलेल्या दुचाकींना लागलेल्या आगीत ३८ दुचाकींसह दोन कार जळून खाक झाल्या. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कैलास भारती आणि राहुल कदम यांच्या तपास पथकाने अधिक शोध सुरू केला. हातात काहीही पुरावे नसताना पोलिसांनी स्थानिक रहिवाशांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. अधिक चौकशी सुरू असताना पार्किंगवरून घाडीसोबत वाद झाल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाडी आणि घाडीगावकर दोघेही विघ्नहर्ता सोसायटीमध्ये राहण्यास आहेत. यापैकी घाडीला दारूचे व्यसन असून, तो घाडीगावकरचा जवळचा मित्र आहे. सोसायटी परिसरात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे मिळेल त्या जागेत मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जात होती. वाहनांच्या गर्दीमुळे घाडी आणि घाडीगावकरला पार्किंगला जागा मिळत नव्हती. अनेकदा यावरून त्यांचा सोसायटीतील रहिवाशांसोबत वाद होत असे. गाड्याच नसतील तर पार्क काय करणार, असा विचार करून घाडीने या दुचाकी जाळण्याचा निर्णय घेतला. अखेर मद्यधुंद अवस्थेत २० मार्चच्या रात्री येथील एका दुचाकीला पेटविले. तर दुसरीकडे घाडीगावकर बाहेर पहारा देत होता. कोणीतरी येत असल्याची चाहूल लागताच दोघांनीही घराकडे धाव घेतली. मात्र वाऱ्यामुळे अनेक गाड्यांनाही आग लागली. (प्रतिनिधी)