Baba Siddiqui Murder Case : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीची पुन्हा एकदा देशभरात चर्चा होत आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. गेल्या शनिवारी सिद्दीकी यांची सहा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी दोन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. अशातच मथुरा पोलिस आणि दिल्ली पोलिसांच्या पथकाने गुरुवारी पहाटे झालेल्या चकमकीत लॉरेन्स बिश्नोई आणि हाशिम बाबा टोळीच्या शार्प शूटरला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीने बाबा सिद्दीकी यांच्याबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि मथुरा पोलिसांच्या कारवाईत लॉरेन्स बिश्नोई-हाशिम बाबा टोळीचा शूटर योगेश कुमार याला अटक करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात दिल्लीत नादिर शाह नावाच्या जिम ऑपरेटरची योगेशने गोळ्या झाडून हत्या केली होती. स्पेशल सेलला आरोपी योगेश हा मथुरेत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचण्यात आला. आग्रा-मथुरा महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर बाड रेल्वे स्थानकाजवळ पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास योगेश बाईकवरुन जात होता. पोलिसांना पाहताच त्याने गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात योगेश हा जखमी झाला.
अटकेनंतर आता योगेशने माध्यमांसमोर बोलताना अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. लक्ष्य कसे शोधलं जातं आणि तुरुंगात कसे संभाषण केले जाते हे योगेशने उघड केले. यावेळी बोलताना त्याने बाबा सिद्दीकी यांच्याबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. मुंबईत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या एक महिना आधी योगेशने त्याच्या साथीदारासह दिल्लीतील जीके भागात नादिर शाहची हत्या केली होती.
"बाबा सिद्दीकी हा काही चांगला माणूस नव्हता, त्याच्यावर मकोका (महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम ॲक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. मकोका सर्वसामान्यांना लागू होत नाही. आता मध्येच कोणी आले तर नक्कीच काहीतरी होणार. त्यांचे (बाबा सिद्दीकी) दाऊद इब्राहिमशीही संबंध असल्याचे बोललं जातं," असे यावेळी योगेशने म्हटलं.
बाबा सिद्दीकींच्या मृत्यूनंतर झिशाश सिद्दीकींची प्रतिक्रिया
"माझ्या वडिलांनी गरीब निष्पाप लोकांचं जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला. घरांचं आणि त्यांचं संरक्षण करताना आपला जीव गमावला. माझं कुटुंब आज मोडून पडलंय. पण, माझ्या वडिलांच्या मृत्यूचं राजकारण केलं जाऊ नये आणि त्यांचा संघर्ष व्यर्थ जाऊ नये असं मला वाटतं. मला न्याय हवा आहे, माझ्या कुटुंबाला न्याय हवा आहे," असं झिशान यांनी एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.