लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट या वांद्र्यातील निवासावर गोळीबार करणाऱ्या दोन बाइकस्वारांची चौकशी सुरू असतानाच लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ओला कार बुक केली असून तो इथेच राहतो का, अशी विचारणा करत ड्रायव्हर चक्क सलमानच्या घरी पोहोचला. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. मात्र, हा प्रँक असल्याचे नंतर उघड झाले. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे.
गोळीबार प्रकरणानंतर सलमानच्या अपार्टमेंटबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. गुरुवारी एक ओला चालक गॅलेक्सीकडे गेला. तेथे लॉरेन्स बिश्नोई कुठे राहतात म्हणून चौकशी सुरू केली. लॉरेन्स बिश्नोईच्या नाव ऐकताच सुरक्षा रक्षकांमध्ये खळबळ उडाली. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी ओला चालकाला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. तेव्हा, एकाने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ओला बुक केल्याने त्यांना घेण्यासाठी आल्याचे सांगितले. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईबाबत चालक अनभिज्ञ होता.
वांद्रे पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या मदतीने तपास सुरू केला. तपासात गाझियाबाद कनेक्शन उघड होताच एक पथक तेथे रवाना झाले. पथकाने २० वर्षीय वर्षीय बीबीएचे शिक्षण घेणाऱ्या रोहित त्यागी या विद्यार्थ्याला अटक केली आहे. विद्यार्थ्याने प्रँक म्हणून ओला बुक केल्याचे सांगितले. वांद्रे पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.